सादु आन आपुन दोगे – सिरील मिनेझीस, मॅरभाट, आगाय
हाकोटे अंद्रेस दात पालीश करीत हिंदाळॅत भॅल्तॉ. दात सॉळॅदो कोलगेट नवता. पन सुलीपुडॅ राहाभर राखेडी होती. ती कामाला आल्ती. दात सोळता सोळता तॉ विसार करतोतॉ, ’माआ नशिबात कोलगेट कतॅ येदॅ कुना गाइ?’ बाबानॅ शाळीत घायलॉता पन ऑ एक दी पन शाळीत गॅलॉ नाय. शाळीतनॅ पळॉन इंटरवलला भारत टॉकिजला जकले शिनिमा तॉ बगॅसॉ पन अॅका पन शिनिमाऑ पूडसॉ भाग तॅला बगॅ भॅठलॉ नाय. अॅका वर्गातनॅ पुडशा वर्गात सरकॅसा ऑ कय नाव घॅ नाय. मंग का? बाबानॅ शाळीतनॅ काडलॉ आन तॅआ दरी अहलेल्यो शार भयी सरॅसॉ बिझनेस काडॉन दिलॉ. दिहा मांगनॅ दि गॅलॅ, पन अंद्रेसशी प्रगती भयशा पाठीओरनॅ नीहरात नोती. भय सारॅशी अन परातभर जीवॅशा पलिकाडॅ तॅला कइस करता येत नॉता. बाबानॅ तॅआ वराडा करता खटपाट केली पन याला पोरी दॅनार कून? भगून ऑ नीखळॉस रॅलतॉ.
निजल्योर आन जागेपनी पन तॉ सपान बगीतोतॉ. सपनात जाम पयशा वाळॉ हॉअॅसॉ अन जाग आलीगा खिशात दमडी पन नाय भगून रंजी हॉअॅसॉ.
बय तॅआ लानपनीस दॅवा घारा गेलती. बाबानॅ वाडविला. शीकशान हॉडॉन जक्ला दिला. पन बाबा कय जनमभर पुरनार हाय गा? हॉअॅसा तास जाला अंद्रेस पस्तीस वहराव जालॉ आन बाबानॅ तॅइ साथ होडली, तॉ पन बयशा भेठीला दॅवा घारा गॅलॉ. अंद्रेसला भय सारॅशा पलिकडॅ कइस येत नॉता. भय पन दुइता येत नोवती, मंग का एकेक करॉन शारू भयो तॅनॅ विकिल्यो. आतॅ पडदॅ ता काम करतॅ अन मिळदॅ ता खातॅ. पन अजून पोत पैशावाळॉ हॉयासा सपान बगीतॅ.
“अलख निरंजन !”
या आवाजाय तॉ भानोर आलॉ. तॉँडाशी राखेडी तासडॅ थुकिली. समोर एक सादु ऊबी हॉतॉ.
‘अलख निरंजन !’
माकून तॅनॅ बॉँब मारली अन आपली झोळी अंद्रेसशा पुडॅ केली. आतॅ अंद्रेस तॅआ सादुआ झोळीत का टाकनार ? डॉब्याये हाडे? तॅनॅ हात जोडलॅ आन पुडॅ जा हांगीला सादुला. पन सादु कय पुडॅ जादो तयार नॉतॉ.
‘बाबा, माझ्याकडे काहीच नाही, तुमच्यापेक्षा माझी हालत खराब आहे.’
सादुनॅ एकदा त्योर बगीला आन मंग तॅआ घर बगीला आन सादु बोयलॉ, ‘बाळा, तू मला काही देऊ शक्त नाही, हरकत नाही. आज मी तुला काही देणार आहे.’
आतॅसादु आपलॅला का देनार ? भगून तॅनॅ माकून हात जोडलॅ आन तॅला जा हांगीला पान सादु एकेक पाऊल टाकीत तॅआ ओट्योर सडलॉ आन अंद्रेसशा बाजूला हिंदाळॅत भॅहलॉ.
अंद्रया भय धॉया बावखालात जासॉ आन भय पानॅत भ्याशी तही इ भय (सादु) हिंदाळॅत भेहली. उठॅसा नाव घॅ नाय. सादु नॅ एक गलास पानी मांगीलॉ. अंद्रयानॅ तॅला पानी पान पाजीलॉ.
‘मला तुझं घर पहायचं ?’ सादुनॅ विनंती केली. अंद्रया घारा का अहनार दावड्याहारका. शारपास भांडे, एक पेटूला, एक मोडकी खुरशी, एक खाट आन एक तळा, तळोर अंद्रयाये शार शार मयनॅ न धोयलेले कपडे. ये कपडे बाईत टाकीले तॅ बाईसा आख्खा मावरा मरदॅ.
अंद्रयानॅ सादुला आख्खा घर दावडला. ऑट्यापासून सुलीपुड आन आंगळॅपासून मिंगार सादुला फिरविला. माकून सादु हिंदाळॅत अॅवॉन आस्साल मांडी घालॉन भॅहलॉ अन अंद्रयाला हात दावड्या हांगीलॉ. हात गांडीला पुहॉन तॅनॅ हात सादुआ पुडॅ कॅलॉ.
‘…तुझ्या हातात धनयोग आहे.’ सादुआ आयकॉन अंद्रयानॅ कपाळोर हात मारलॉ.
‘… तू पैशाच्या राशीवर लोळतो.’
‘आरॅ, aaडॅ फाटक्या सादरीओर लॉळता दी गॅलॅ आन ऑ पैशा राशीओर लॉळाते आहा हांगातॅ तॉ?’ इ अंद्रया मनातशा मनात बोयलॉ. तॅआ मनात आला, लाथ मारॉन या सादुला हिंदाळॅतनॅ खालशावर पाडॉगा का? तॅनॅ पाय पन टुकीलतॉ. पन सादु पुडॅ जा बोयलॉ ता आयकॉन तॅनॅ पाय खालशा खाला ठोयलॉ.
‘तुझ्या घरात पूर्वजांनी खूप धन, सोने, चांदी, पुरून ठेवली आहे आणि तू एकटा त्याचा मालक आहे. बाळा!’
इ आयकील्या बरबर ऑ धावात सुलीपुडॅ गॅलॉ. स्टो पेटविलॉ आन सादु बाबाकरतान वगळ शा घॅऑन आलॉ. एक टाइम आहा हॉता, नुसत्या दुदाव शा अंद्रया घारा बनतॉतॉ. पन आतॅ टिमकॉभर पन दुद तॅआ घरात नॉता. शा पिल्योर सादु उठलॉ आन जा निंगालॉ, तहॉ अंद्रयानॅ माकून सादुला हिंदाळॅत भेवडला आन विसारला.
‘सादु बाबा एकदा ते धन नेमकं कुठल्या कोपर्यात पुरलय ते सांगा. तुम्ही मागाल ते देतो.’
सादु माकून हिंदाळॅत भॅहलॉ आन बोयलॉ, ‘ते धन कुठल्या कोपर्यात ठेवलय ते मी सांगू शकत नाय अन ते धन तुला हवं असेल तर मला या घरात पूजा करावी लागेल. तीन दिवस पूजा केल्यावर
चौथ्या दिवशी तू घरात खणायला सुरवात कर, सात दिवसांच्या आत तुला धन सापडेल. तुझ्या इच्छेनुसार तू मला दक्षिणा दे.’
“अलख निरंजन!”
बाबा घरात यावे, लगेच पूजेला सुरवात करु.’ अंद्रयाला उतळी पड्लोती.
‘पूजा रात्री बारानंतर सुरू करावी लागते.’
तॅआनंतर सादुला अंद्रयानॅ घरात घॅट्ला. सादु खाट्योर आडवॉ जालॉ. आन अंद्रया संयपाकाला लागलॉ. खुराडॅशी एक कोंबडी काडली आन ती रांदीली. सादुनॅ आडवॉ हात मारलॉ. वरलॅला अंद्रयानॅ खाला. बारा वाजलॅ गा सादु पूजा सुरू करॅसॉ हाकोटपोत पूजा सलॅशी. मंग दोगे हायत्याशे. तीन दी पूजा जाली. रॉजशी एक कोंबडी कमी होतोती. अंद्रयानॅ बडदास्त ठोयलती. उदारीओर सामान हाडॉन हुकाळीइ उदारी केल्ती. आठ आठ दी आंग न धॉनारॉ अंद्रया सादुला आंग धॉयादो पानी तापवॉन देतॉतो. हाकोट जाली गा हाथात टमरेल घॅऑन सादुला बावखालात परसाकडॅ नेतॉतो. तॅय पाय दाबॉन देतॉतो. एकदासॉ सवथॉ दी उजाडलॉ आन मावाळलॉ. अंद्रया रातशॅ बारा वाजॅशॅ वाट बगीतोतॉ. रातशॅ बारा वाजलॅ आन अंद्रयानॅ कुदळ घॅऑन खीनॅदो सुरवात केली. हप्पेरात खीन खीन खीनॉन पन कय हापडला नाय. अडॅ सादु गोकुळात हॉतॉ.
खाय पे आन लॉळ. दुहरी रात गेली बवतेक घर खीनॉन जालता पन तॅला तांबडॉ पसॉ पन हापडलॉ नाय. आतॅ एक कॉपरॉ रॅलतॉ, तॉ उद्या रातीला खनलॉ गा या अंद्रयाव अंद्रयाशेठ हॉनार या कल्पनॅय अंद्रया आडवॉ जालॉ. आज जरा घना काम कॅल्या पायान अंद्रयाइ धूम नीज लागली. शेत पडलॉ तिगाळा रातशॅ आठ वाजलोतॅ. तॅनॅ अॅँगातॅँगा बगीला पन सादु कय दिख्लॉ नाय. गावात फिरॉन आलॉ पन सादुऑ पत्तॉस नाय. एकदम तॅइ नंदार पेटूल्योर गेली.
पेटूला उगडा हॉता. तॅनॅ पेटूला बगीला आन बद्कन खाला भॅहलॉ. पेटूलॅत ठोयलेली बयशी हॉन्याई बोरमाळ आन कानाश्यो वाळयो आन बाबाइ हॉनॅइ अंगठी आन पय पय करॉन जमलॅलॅ साडेबारा हजार रुपय घॅऑन सादु फरार जालतॉ. वाये, इ विकती कळ आपुन घरात ठोयले इ कळॅदो बरॉस ऊहुर जालतॉ. तॅआ आख्खा घर खीनलॉता. बॉँबाट हॉअॅशा आदी खडॅ बुजवीलॅ तॅ पात. अजून दोन दी खपॉन तॅनॅ खडॅ तॅ बुजवीलॅ पन सादु नॅ कॅलॅलॉ खड्डॉ कॉहॉ बुजवॅसॉ..?