बो तू रांद आन मा पॉटाई नांद – रिचर्ड मच्याडो, टोरोंटो, कॅनडा
(फरशा अन झुज्या जिवलग मित्र. गरीब परिस्थितीमुळॅ शिक्षान जाला नाय. त्यामुळॅ लिखान-पदान नाय. खुब मेहनत करॉन दॉगाई आपले कुटुंबे वाडविले. खुब भॉटॉ त्याग कॅलॉ त्याई पन त्याआ त्यांना ना सुख हॉता ना दू:ख. जा का जीवनात पुडॅ आला त्याव खुशीनॅ स्वीकार कॅलॉ. फरशाला तिन्ही पोर्यो आन झुज्याला दोन पॉर. त्या काळात पोर्याआ बापाला मान नॉतॉ पन नंतर पोर्याये बरे शिक्षानॅ आन लग्ने जाले. एक पोरी तॅ कॅनडात स्थायिक जाली. मग पोरीनॅ आयबापाशी कॅनडाई वारी केली. कॅनडात रॅवॉन फरशा जाम खुश झालॉ. घरा परत आल्योर त्यानॅ झुज्याला जा हांगीला त्यावर ई एकांकिका हाय. मरीबायसा घर मंजॅ दोगाआ नॅहमीसा ठिकान जडे तॅ नॅहमी नवटाक-पावशेर मारत्यात, मरी बाय पन ई प्रवासवर्णन आयकॉन चाट पडली.)
(पयला दृश्य :- फरशा त्या जावायश्या घरनॅ परत जात असताना रस्त्यात त्याला झुज्या भॅटातॅ)
झुज्या : अरॅ फरशा, हा कडॅ आन आलॉ कतॅ.
फरशा : माआ जिवलगा, मॅ जिवंत हाय. आन कालूस आलॅ. पन माई बायकू कय माला निजॉन दे नाय. तिनॅ आतॅस पोरी घरा ता सामान पॉशव्या हांगीला. तू बरॉ हा ना.. तब्बॅत तॅ बरी दिखातॅ.
झुज्या : फरशा, का हांगॉ, जीव हाय भगून जगातॅ. नाय तॅ मेलॉसॉ तॉ बरॉ. तुयी तब्बॅत तॅ बरी दिखातॅ. पक्कॉ तांबडॉ तुंबडॉ करॉनूस पोरीनॅ धाडलॅ.
फरशा : झुज्या, का हांगॉ तुला. आपुन कतॅ ओडी भोटी दुनिया बगीली नाय. मूंबयला माला सगळ्योस इमारती हारक्यो दिखात्यात. पन झकास हाय अमेरिका.
झुज्या : अरॅ कॉडॅ दी तडॅ हॉतॉ आन का कॅला आन का खाला ता तरी हांगॅदा गा नाय.
फरशा : खॉटा कादो बॉल्यासा पन मा जावाय आन
पोरीनॅ आमशी खुब सोय केली. आमाला कय कमी पडॉन दिला नाय.
झुज्या : दगड तरलॅ आन हेनी बुडल्यो. पोर्यो हात तॅ जिकले आन आमे पॉरावाळे पार बुडले. तुला एका मागॉमाग तीन पोर्यो जाल्यो तिगाळा माला वाटला तू खपलॉ. पुडॅ तूआ का हव्यासा ? पन तू जिकलॉ. मॅ मात्र ऑबायशा हातसा सुमाळना जालॅ. माई कारभारनी ती त्यापेक्षा, न बोयलेलास बरा.. जॉ दी भरातॅ तॉ खरॉ.
फरशा : तॅ दी आठविलॅ गा डॉळयात पाणी येतॅ. पन दॅवानॅ सगळा निभाऑन निला. माआ कारभारनीनॅ खूब खस्ता खाल्यो. आतॅ बरॅ दी आलॅ, तुयॅ पन बरॅ दी येद्यात.
(झुज्याआ पाठीओरनॅ हात फिरवीत फरशा त्याआ सांत्वन करतॅ)
झुज्या : जाउन्दे, तडे का कॅला आख्खो दी आन कडे कडे फिरलॉ.
फरशा : का बग्याशी ती दुनिया. ना कसरा ना घान, सगळा कहा बारलेला… बरा.. आपलॉ आशवीत्यात तॉ पानी कडे जातॅ तॉ पन दिखॅ नाय. कसरा आन सांडपान्याई माला खीत आली.
झुज्या : आडॅ पाय टाकॅ तॉ चिखलात, आन लोक बी सांडपानी रस्त्यात होडत्यात आन देवळात जात्यात. ज्याला जा बरा दिखॅदॅ ता तॉ करतॅ. बरा… लोकबिक आपल्या हारका गा.
फरशा : अरॅ, लोक हाय गा नाय, कुन दिखॅ नाय. ना आवाज ना गोंगाट ना कुत्र्याव बोंबाट, माहनॅ घरात हात गा नात ता पन कळ्यासॉ मार्ग नाय. कुन कुनाला काय विसरी नाय, जॉ तॉ आपल्या कामात.
झुज्या : आडॅ तॅ जातायेता, कडॅ गॅलतॉ आन कडॅ जाऑन आलॉ त्याव हिशेब द्या लागातॅ. दोन-तीन डोकर्यो हात ना, त्यो कुनाला होडीत नाय. आन माहनाव मारॉ नाय पडलॉ ना तरी कुत्र्याव पडतॉस आहातॅ.
फरशा : तू बरी कुत्र्याय आठवन केली, अरॅ, कुत्र्या-मांदरीये तडॅ बरॅ दी आल्यात. अरॅ, त्यायी खरी मजा हाय. काय त्यायॅ लाड करत्यात.
झुज्या : ऑडॅ तॅ आपुन कुत्र्याआ नजर्यात नाय दिखाव..
फरशा : पुडश्या जन्मात कुत्र्याआ जन्मा घायला तॅ तडॅ घाल्या पाय.
झुज्या : तुयी पोरी आन जावाय बरे हात ना.. बरा.. आपल्या अडसा कुन भेटलॉता गा नाय.
फरशा : सगळे बरे हात. हिनवार-आयतवार तर आमॅ घरास नाह्याशे. आपली खुब मंडळी हाय तडॅ. सगळेस आमाला बोलवित्यात. मा वजान वाडला. खासा आन प्यासा तरी कॉडा.
झुज्या : मास्तरशी कंपनी बरीस हाय ना.
फरशा : मास्तरशा सगळ्या पॉरापोरीनॅ आमाला बोलविला. मोत्याशेठशी नातनी केले त्यानॅ माई सोय झकास केली आन आपलॉ खिवनीसॉ पॉर हाय त्यानॅ माकून मोत्याशेठशी दुहरी नातनी केले. वसईशी कंपनी खुब हाय, आपुन कुनाला ओळखात्याव ?
झुज्या : गरीब लोक तडॅ हात गा, सगळेस शेठ..
फरशा : गरीब कुन अन शेठ कुन. सगळेस गाडीत फिरात्यात. बायकू अन गवमाहनू, कतॅ कतॅ कळॅपन नाय.
झुज्या : सगळे पांढरेस हायद्यात.
फरशा : पांढरे हात, काळे हात आन आपलॅ फॅट्यावाळॅ पन हात. यॅ सरदारजी कत्तॅ तडॅ पॉसलॅ. आपुन त्याई चेष्टा करत्याव.
झुज्या : ऑडॅ सरदारजी तडॅ हात गा ! कमाल हाय, लोक कडॅ पॉसलॅ आन आपून हाव तडॅस हाव.
फरशा : कहा बोयलॉ ! खरा हांगॉ तुला, दुनिया कडे पडले, पन आपला घर बरा अन् आपुन बरे. आपले माहने जातायेता बॉलात्यात, तडॅ तर कुन कुनाबरबर बॉलॅ पन नाय. जॉ तॉ कानाला कयतरी लाविलॅ आन कय आयकित्यात देव जानो..
झुज्या : पोरीला किती पोरे ? एक पॉर आन एक पोरी ना.
फरशा : हा, नातू आन नातनी.. तॅ का बॉलात्यात ता माला समजॅ नाय आन माला का हांग्यासा हाय ता त्यांना उमजॅ नाय.
झुज्या : नायतरी अडशे पोरे तरी आपला कडॅ आयकात्यात, सगळ्यांना नावानॅ हाक मारत्यात नातॅ सगळेस अंकल.
फरशा : आतॅ त्या पॉराई आडॅ कादो यॅ. तॅ तडॅस र्याशे, लग्ने तरी आपल्यात हॉयद्यात गा नाय कूनॅ बगिलॅ.
झुज्या : मग तडशी बर्यापैकी कय हाडले गा नाय.. मादो कय तरी हाड्यासा..
फरशा : तडशी दारू न एकदम मोळी.. आपली मरीबायशी दारू का ? एकदम झकास.. पिल्याबरबर तुला कहा घुमरवितॅ.. आख्खी बाटली पिलीतरी तूला तडशी दारू सड्याशी नाय.
झुज्या : मग आपुन मरीबायश्या दरी गेलेले बरे. तू गेल्यापासून मॅ तडॅ गॅलॉ नाय. नायतरी तिनॅ परत उधारी विसारेस.
(दुहरा दृश्य – फरशा आन झुज्या, मरीबायश्या घरा दारू प्या जात्यात. तडॅ पयलॉ त्यांना मरीबाय सॉ राग बग्या लागातॅ)
झुज्या : मरीबाय ओ मरीबाय, हा गा नाय, कय बॉलॅ पन नाय ती..
मरीबाय : होय, होय.. मेली नाय, मेल्योर कोड्यो हाको मार्यात त्यो मारा.. का जालॅ ?
झुज्या : मरीबाय, बगीलॉ गा नाय, अमेरिकेसॉ पावनॉ आलॅ.
मरीबाय : अरॅ कुन्या, तुमॅ आलॅ कतॅ, गेले तॅ कय न बॉलता गेले, आमॅ कय तुमश्या मागॅ लाग्योते.
फरशा : मरीबाय, का हांगॉ तुला., सगळी उतॅळी जाली. पोरीनॅ तडनॅ फोन कॅलॉ आन आमशे तिकिटेस काडॉन धाडले. माआ कारभारनीला वाटातॅ जकलास अडसा तडॅ नॅवो गा का ? का का तिनॅ बॅगमिनॅ भरला ता बोल्यादो नाका, त्या भानगडीत कुनाला कय पन हांग्यासा रॅला..
मरीबाय : माला कय त्याव राग नाय पन बाय नॅ पन कय बॉयला नाय. बरा.. तुमसॉ प्रवास पन चांगलॉ झालॉ. खुब कय बगीला हाय दॅ.
फरशा : तुला जकला हांगातॅ पन पयली अर्दी बाटली हाड. आपली घरशी ती घरशी दारू. तडश्या दारूला कय सव हाय गा ?
झुज्या : बरॉबर बोयलॉ, मरीबायश्या डारुला सवूस निराळी.
मरीबाय : तुमॅ कय बॉलॉ नाका, तुमाला मॅ दारू दॅनार नाय. उधारी कूनॅ द्याशी.
झुज्या : मरीबाय, आतॅ सगळॅ पैशॅ डॉलरमिनॅ दॅनार अन तू पैशाला घाबरल्या ? फरशानॅ आतॅ बॅग भरॉन पैसॉ हाडलॅ.
मरीबाय : त्या पैशाला आग लागॉ, लंकेत हॉना हाय पन त्याव आपल्याला का फायदॉ.
(मरीबाय दारुयी बाटली हाडॉन देतॅ, दोगीपन दारू पॅवॉन टाईट हॉत्यात)
फरशा : मरी बाय, का हांगॉ तुला, दारू बाठल्यो सॉबात्यात पन दारू कय कामाय नाय
मरी बाय : तडॅपन आपल्याहारकास लोक हाय दॅ ना !
फरशा : सगळे हारखेस, कुन पोन्या नॅहातॅ अन कुन लांबी टूमन घालतॅ. कुन गाडीत जातॅ अन कुन पायी फिरातॅ, कुन मटन खातॅ तर कुन डाळ खातॅ. आपलॅ रितीरिवाज निराळॅ तहॅ त्यायो रितीभाती निराळ्यो. बाकी आपल्यास हारके माहने, त्यांना दुःख हाय न सुख पाय.
झुज्या : दारूबद्दल आबारी… येतॅ मॅ..
दे मरी नवटाक दे ग
पयल्या धारीशी नवटाक दे ग
दे ग दे नवटाक दे पयल्या धारीशी (फरशा आन झुज्या गानॉ बॉलात जात्यात)