माआ पीएशडीशी (PHD) कानी  – डॉ. नेहा सावंत

          तॉ दि आजपन माला बरोब्बर आठवातॅ. २०१२ ला भुईगावशा युवक वाचनालय आन  ‘व’ अंक याई वसयशा वर्तक शाळीत ‘साहित्य संप्रेषण’ नावासा एक दिहासा साहित्य संमेलन ठविलता. तडे माव जुनॉ मित्र आन मास हॅजाळसॉ कवी वर्जेस सोलंकी यानॅ माला तडॅ यासा वारना कॅलता. ऑडास नाय तॅ कारिक्रमाआ निवेदन करॅशी आख्खी जबाबदारी मा आंगोर टाकीलती. मॅ पन ती हारकी निबाविली. तडे वर्जेसनॅ माई ओळोख ख्रिस्तोफर रिबेलो आन एडवर्ड डिसोझा याहरी करॉन दिली. वर्जेसनॅ हांगीला गा ये ‘कादोडी’ नावासॉ तॅआ बाशेसॉ अंक काडत्यात. ‘कादोडी’ अही कुहनी बाशा हाय, ई मॅ पयलॅँदास आयकातोती. माआ मनात बेताम प्रश्न उबी रॅलॅ. कारिकरमा दरम्यान पानी पॅआ करता मॅ बार आली. तडॅ ये दोगी कयतरी बॉलात ऊबी हॉतॅ. माला इ बाशा आयकॅदो वायलीस वाटली. कोडी फास. मंग सदारन २०-२५ मिंटे मॅ या दॉगांना मा मनातशॅ प्रश्न विसरोन माइती घेट्ली. ख्रिस्तोफर आन एडवर्डनॅ बर्‍यापैकी माइती दिलीस पन या बाश्योर अद्याप कुनॅ कैस काम कॅला नाय ई आयकील्योर आपुन योर काम करेसा आहा तडश्या तडे मनात ठरविला. पन जा आपुन ठरवीतॅव त्योर हाथालागली थोडीस काम करतॅव…. मा पन ताहास जाला.

         तॅआ नंतरश्या दोन-तीन वहरात ख्रिस्तोफरशी तीनशारदा भॅट जाली, आन दरपाळी तॉ माला आठोन करॉन दॅसॉ. मंग मात्र मॅ मनोर घॅटला आन कामाला सुरवात केली. खरामिंजॅ तहॉ उहुरुस जाल्तॉ. तॉँड वर करॉन मे बॉलॉन बेहल्ती गा या बाश्योर मॅ संशोदन करनार. पन अ‍ॅखाद्या बाश्योर संशोदन करॅसा मिंजॅ परयोगशाळीत जाऑन कापाकापी करॉन तॅआ विश्लेशन करन्याहारका नॉता. भले मॅ मराठी शी मास्तरीन अहली तरी अ‍ॅखाद्या बाशेआ संशोदन कर्‍या करतान का का करॅ लागातॅ ई कय गाई नॉता. कादोडी बाशेलास कुपारी आन सामवेदी बाशा बॉलातॅत ई पन माइत नॉता. ई बाशा कही हाय, लिवीतॅत कही ई कइस गाई नॉता. ख्रिस्तोफरनॅ दिलॅलॉ एकुस ‘कादोडी’सॉ अंक मा पा हॉतॉ. पयलॉ मॅ तॉ वाशिलॉ. सब्द बेतान वायलॅस हॉतॅ. खूपशॅ सब्द मॅ पयलॅँदास वाशिलॅ. तॅतशी ‘जक्ल्या कुपारी बांदवांना नाताळ हनायो ओब्ड्यो सुबेच्छा.’ ई पयली ओळ वाशिली, आन मंग माला हुमजाला गा जक्ल्या मिंजॅ सगळ्या आन हन मिंजॅ सण. मंग आख्खॉ कादोडी अंक वाश्या जाम मजा आली. अस्तॅअस्तॅ माला एकेक सब्द हुमजॅदो लागलॉ. या अंकामीनॅ जक्ल्या लेखकांशॅ नंबर दिलतॅ त्योरनॅ मॅ जकल्यात पयलॉ फोन सायमन रॉड्रिग्ज आन सिरील मिनेझिस यांना कॅलॉ. तॅआ दॉगांना जाऑन भेटली. तॅआ दॉगां घारा मा आ बर्‍यापैकी

स्वागत जाला. सिरीलनॅ तॅ तॅआ दरसा जक्ला लिखान माला दॅऑन टाकीला. सायमन रॉड्रिग्ज तॅ जवळूस रॅतोतो तॅ तॅआ घारा जाऑन मा मनात अहलॅल्या जक्ल्या प्र्श्नाये मॅ उत्तरे घॅऑन आली. मनात हुरूप आलॉ. आंगात बळ आला. मंग मॅ मा आ संशोदनाइ सौकट मनात तयार करॉन तॅऑ आराखडॉ तयार कॅलॉ.

         २०१७ मीनॅ मॅ माव संशोदना ऑ आराखडॉ मराठी विभागात दिलॉ. तॉ देतानास तडे माई मुलाखत पन घेट्ली. तिगाळा तडे बेतान शरशा जाली. तवपोत डॉ. नरेश नाईक याई, ‘सामवेदी भाषेचा संरचनात्म्क अभ्यास’ या विशयोर संशोदन करॉन डॉक्टरेट मिळविल्ति. ऑडास नाय तॅ  तॅँना तॅँआ संशोदनाकरता अ. का. प्रियोळकर पुरस्कार पन मिळाल्तॉ. आतॅ नियमापरमानॅ माला तॅआस विशयोर संशोदन करता अ‍ॅनार नॉता. आन ताहा पन माला सामवेदी बाशेत लिवलॅल्या साहित्य आन तॅतशा समाजाऑ-संस्कृतीऑ अभ्यास करॅसॉ हॉतॉ. माआ बॉलना आयकॉन समितिनॅ, संशोदनाला मॅ दिलॅला नाव बदल्या लागेदे आहा हांगीला. तॅआ मुलाखती वक्ताला माव जीव घाबारलॉतॉ. आपुन कॉड्या पान्यात हाव इ जान्वाला. कॉडा बॉठ्ठा आबाळ गाठॅसा हाय आन कॉडॉ दर्‍यो उपॅसॉ हाय इ जान्वाला. इ काम वरवरनॅ दिखातॅ तॉडा सॉप्पा नाय इ कळॉन सुक्ला. मॅ मा आ संशोदनाव विशय सामवेदी समाज आन सामवेदी बोली पुरता न ठविता सामवेदी ख्रिस्ती समाज मिंजॅस कुपारी समाज आन तॅआ समाजासा लिखित-अलिखित साहित्यासा सामाजिक, सांस्कृतिक आन वाङ्गमईन आंगानॅ अभ्यास अहॉ कॅलॉ. मुंबय विद्यापीठातश्या प्रमुखानॅ माला हांगीला गा ‘नुस्ते पास-स अंक, पन्नास लोकगीते आन दोनशे म्हनीनॅ ऑ अभ्यास हॉनार नाय. आन नुस्ता संख्यात्मक नाय तर तॅआ साहित्याव दर्ज्यो पन तपाशीलॉ पाय. ‘तुमाला निदान शंबर कविता, पन्नास कान्यो, एकांकिका-नाटक अहे सब्बान परकार मिळविलॅ पात, अभ्याशिलॅ पात.’ इ आहा आयकिता खोटी मा नंदर्‍यापुडॅ तारॅ आलॅ. इ ऑडा साहित्य काहा आन कडने हाडॅसा. माला कय सुशेसास रॅला.

         मा आब्यासाला सुरवात पन जाल नोती आन एक दि माला फोन आलॉ, ‘मॅ रोशल बॉलातॅ, तुमे आमशा कादोडी बाश्योर पीएचडी करत्या ना मंग माला अही अही माइती पाय ती हांगा ना.’ आतॅ जाली गनाय पंशायत..! अजून माआ कामाला सुरवात पन जाल नोती आन मॅ संशोदन करतॅ इ बातमी वार्‍याहारकी वसयमीनॅ पसारलोती. माला वाटला इ पोरी माई परीक्षा घ्या लागले. माला थॉडाफार जा का माइती हॉता ता मॅ तिला हांगीला. माआ बोलन्योरनॅ तीआ समादान जाला बवतेक. ‘माला तुमाला भॅटॅसा हाय’ आहा ती बोयली. मंग आमी वसयलास भेटले. तिगाळा ती मादो एक २०१२सॉ पाशीहार अंक घिती आल्ति. तॅतसा बरास लिखान मा कामाआ हॉता. त्योर संपादक जिम रॉड्रिग्ज आन बी मंडळीशॅ

नंबर हॉतॅ. आदी त्याहरी बॉलॉन मंग भॅट आहा मा काम सुरू जाला. जिमनॅ २०१२ पासूनशॅ जक्लॅ अंक दिलॅ. आन मंग मॅ नव्या हुरूपानॅ कामाला लागली. आतॅ मापा कादोडी आन पाशीहार शॅ खुब अंक जमा जाल्तॅ पन माला जॉडा पावता तॉडा साहित्य तॅत नॉता. माला अजून शोद घॅना भाग हॉता.

         कादोडी आन पाशीहार या अंकामिनॅ अहलॅल्या जकल्या माहनाइ माला खुब मदत केली. मॅ सरळ तॅँआ घारास जाशी. परतेका घारा ऑबडा पिरेम मिळॅसा. दरपाळी माला नवीन लेखक-कवी नाव आन पत्तॉ मिळॅसॉ. यातनॅस बर्नादेत रुमाव, सॅबी परेरा, सिमसन रॉड्रिग्ज, एमेल आल्मेडा, फ्रान्सिस डिमेलो, सबिना फोस, फ्रँक मिरांडा अहया खुपश्या लॉकाइ ओळोख जाली. कुन कविता लिवॅसा, कुन कानी तॅ कुन लेख. जाम भारी वाटॅ लाग्लोता. परतेक जन दुहर्‍या नाव सुसवीतोता. कुनॅतरी हांगीला, ‘तुमे बबन गुरुजीला भेटल्या गा ? तॅइ कादोडी मिनॅ पयला नाटक लीविलता. मंग आमसा गाडा तडॅ वळॅसा. कुनॅ हांगीला आगायसॉ सिरील मिनेझिस ऑ पयलॉ कुपारी लेखक जॅये कादोडीतशे पुस्तके प्रकाशित जाल्यात. सिरील दरनॅ माला ९ कादोडी एकांकिका मिळाल्यो. सायमन रॉड्रिग्ज याई पाकिस्तान आन ढाका परवास कॅलतॉ तॉ अनुबव कादोडी मिनॅ परवासवरनना रूपात मिळाला. बगीता बगीता मापा जकल्या परकारसा ऑबडा साहित्य जमा जाला. आतॅ या जकल्याआ मॅ करॉ का? काहा जमॅसा माला? इ बाशा माला अजून हुमजालेली नाय. कॉडॅ प्रश्न. माआ डॉखा दूखॅ लागला. मापा कादोडीतसा लोकसाहित्य आन ललितसाहित्य दोनू परकारसा जमा जाल्ता. तॅइ वाट्नि करॉन तॅऑ सामाजिक, सांस्कृतिक आन वाङ्गमय अहया आंगानॅ अब्यास करॅसॉ हॉतॉ. तॅआ आदी माला या समाजाव इतिहास, तॅँशी संस्कृती समजॉन घॅना भाग हॉता.

         मॅ ठरविला गा कय पन आन कॉडा पन जाला तरी या नांगराला हात घालॅसॉस. पन मनात धाकधुक होती. कारन जॅआ जॅआ माहनांना मॅ भेटली ते जक्ले नावानॅ, मनानॅ आन ज्ञानानॅ मा पेक्षा बोठ्ठे होते. तॅआ जक्ल्यांना तॉँड दॅसा हॉता. मागॅ हट्लि तॅ कदाचित जक्ले माई टिंगल करदॅत या विसाराय माई नीज उडालती. ‘पुडॅ वय मांगॅ नय’ अही माई गत जाल्ती. भगून मॅ ठरविला गा पयली इ बाशा हिकोन घ्याशी. ती निखळी लिखान वासॉन जमनार नाय. तॅतॅन मॅ उल्टॉ परवास सुरू कॅलॉ. शेवटी करॅसा काम पयला कॅला. अ‍ॅखादी बाशा हिक्या करतान तॅआ बाशेतशा समाजात- माहनात जाऑन बॅहॅ लागातॅ, तॅआ हरी बॉलॅ लागाते. भगून मॅ मुलाखती घॅदो सुरवात केली. त्यामूळॅ जाला आहा गा मॅ जॅआ जॅआ घारा गेली तडे माला बाशा आन संस्कृती जवळनॅ अनुबवता आली. मॅ पास मुलाखती घॅसा ठरविलता. तॅतशी पयली मुलाखत फा. फ्रान्सिस कोरिया यांशी घेट्ली. कारन कुपारी समाज

मिंजॅस सामवेदी समाज आणि सामवेदी बोलीबाशा योरसा पयला संशोदन फादरनॅस केल्ता. तॅआ वाटेओरनॅस माला जासा हॉता भगून पयली मुलाखत तॅँशी घेट्ली. मनभरॉन तॅँइ माला आशिर्वाद दिलॉ आन तॅँशा कबाडातशे कैक पुस्तके माला भॅट दिले. तॅत मा कामाय पुस्तके जास्ती होते. अडे माला कत्तॅस बाहता यासॉ नाय अहॉ अनुबव आलॉ. आन तॉ माकून माकून आलॉ. तुमशा कामोर तुमी प्रेम करत्या हायद्या आन नाखॉडॉ धीर धरलॉ तॅ यॅस तुमाला मिळनारूस. मॅ कादोडीमिनॅ लीवलेली कादंबरी शोदीतोती. तही मापा सिरील मिनेझिसशी ‘बबन’ इ कादंबरी होतीस पन कादोडी बाशा ओडी जुनी हाय तॅ तॅआ मिनॅ अगोदर कुनॅतरी लीवॅसॉ प्रयत्न कॅलॅ हायदॅस आहा माआ मनात हॉता. दिवंगत सी. बी. दोडती यांशी ‘सावट’ इ कुपारी समाजाओरशी पयली कादंबरी हाय इ आयकील्ता. जाम शोदीली. लायबरीत बगॉन जाला. बॅतान जनांना विसरॉन जाला आन शेवटी फादरश्या कबाडात दोडती यांसा जक्ला साहित्य हापडला तॅत इ होती. मिंजॅ ‘हलाडी लेकरू आन गावाला वॅडॉ’ अही माई गत जाली. तिगाळा माअॅ डॉळॅ भरलॅ तॅ फादर बोयले, ’हा शुभ संकेत समजा तुमच्या कामाचा. पाहा चर्चचा घाट पण वाजला. तुम्हांला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल.’ तॅँसा आशीर्वादा इ बॉलना आयकॉन मा आंगोर काटे आले. नवॉ हुरूप आलॉ.

         तिगाळा मॅ ख्रिस्तोफरशा नेहमी संपर्कात अहॅशी. तॅनॅ माला हांगीलता गा सी. बी. दोडती तॅव मामरसॉ आजोबा. तॅनॅ पन माला दोडती यांशे कैक पुस्तके दिले. मॅ आतॅ जक्लि वाट्नी करॉन वाश्या सुरवात केली. सिरीलनॅ माला फा. कोरिया याई लिवलॅला ‘सामवेदी समाज आनी सामवेदी बोली’ इ पुस्तक दिल्ता. तॅतनॅ सामवेदी ब्राह्मन आनी सामवेदी ख्रिस्ती लॉकांव इतिहास माइत जालॉ. पयल्या दोन धडॅइ तयारी करता येदे आहा वाटॅ लागला. कादोडी बाशेतशे दा-पंद्रा पाने रॉजश्या रॉज वाशॅशी, तॅतशॅ सब्द, म्हनी वाकप्रचार याव अर्थ समजॉन घॅशी. मजा येतोती काम करताना. कुपारी समाजातशॅ पयलॅ संशोदक फा. कोरिया, पावलू मास्तर, पयलॉ कुपारी नाटककार बबन गुरजी, पयलॉ एकांकिकाकार सिरील, अयल्या पयल्या कादोडी अंकाव संपादक ख्रिस्तोफर आन कुपारी महोत्सवाव आयोजक जिम यांशा मुलाखतीतनॅ माला खुब बॉठ्ठा सामाजिक आन सांस्कृतिक भांडार मिळाला.

         दर आयत्वारॅ मा गाडा वसय-विराडा जासा. कतॅ सामवेदी सम्मेलन, कतॅ कादोडी माई कवतीकाइ, तॅ कतॅ लोकगीत स्परदा. कुपारी महोत्सव अहया जकल्यात जकॅसा. एकुन मा काम जॉरात आन मजेत सुरू हॉता. एक दी माला सिमसन रॉड्रिग्जसॉ फोन आलॉ. बोयलॉ गा मा घारा एक गेटटुगेदर ठवॅसा हाय. तॅनॅ पत्रकार भाऊ तोरस्कर, सिरील मिनेझिस, सचिन मेंडिस, बावतीस पेडीकर, जीम अह्या माहनांना वारना कॅल्ता. मस्तपैकी जीवनाऑ बेत कॅल्तॉ. मॅ कुपारी संस्कृतीऑ अब्ब्यास करतॅ तॅतॅन जिव्यादो इंद्याल, कोमडी, सर्पतेल,

वाला गॉळॅइ भाजी, सान्ने केलते. रोटयो आन चिकन भारीस जाल्ता. तडॅ कादोडी बाशेओर शरशा जाली. ई बाशा टिकव्यादो का का करता येदॅ योर भाऊ तोरस्करनॅ आपला मत हांगीला. सिमसनसा आख्खा कुटूम तॅइ दादय, काका, बायकू, बेन, हाऊ जक्ले आमशी सरबराई कॅरॅदो गुतलोते. जिगाळा जक्ले जा निंगाले तिगाळा परतेका हाता मॉट बांदॉन दिली. तॅत वसयशे सुकेळी, सामट्यो, रॅवाळा, केळे आहा पंचरशी खाना हॉता. मॅ मायारनॅ हार्‍याआ साल्ली आहास माला वाट्या लागला. तॉ दी मॅ कत्तॅस बाहॅशी नाय. तॅ दिहापासून माआ अब्यासाला दिशा आन वेग मिळालॉ ई मात्र खरा.

         दर आयत्वारॅ आन हुट्टीआ दिहा मॅ वसयला कुनान कुना घारा अहॅशी. तॅतनॅ माला खूपशी माइती परतेका दरनॅ मिळाल्ती त्योरनॅ मा दुहर्‍या परकरनाई तयारी जाली. तॅआ करता लागनारॅ फोटो घॅता आलॅ. तॅआ आन सुरवातीला घॅटलॅल्या मुलाखतीऑ उपयोग माला संशोदना परिशिष्ट मिनॅ देता आलॉ. दर वहराश्या कुपारी महोत्सवाआ खाद्यमॅळावॅतनॅ कुपारी खाद्य-संस्कृती अनुबवता आली, बगीता आली आन साकीता पन आली, खॉटा कदॉ बॉलॉ.

         आहा जक्ला बेसखास्सा सल्लोता तव दोन वहरा करता जक्ला बन जाला. कोरोनानॅ कडॅ जा – या शी बंदी घायली. माई बॅतान रगाजळ जाली कारन मा काम अडकाला. पन बॉलातॅत ना ‘जा हॉतॅ ता बर्‍या करता हॉतॅ.’ कोरोनात जॉ वेळ मिळालॉ तॅत मॅ माआ लिखानाला सुरवात केली. कादोडी, पाशीहार आन ख्रिस्तायन मिनश्या लिखाना आकलन आन वाटणी कर्‍या सुरवात केली. जॅआ जॅआ वॅळा अडसन आली तॅआ तॅआ वॅळा सॅबी, ख्रिस्तोफर आन डिमेलो सर यांशी मदत घॅऑन काम सुरू ठ्विला. या बंदी काळात ऑनलाइन प्रोग्राम बो जालॅ. ऑनलाइन भॅट हॉया लागली. एक दी मॅक्सवेल लोपीस यानॅ फोन कॅलॉ. कादोडी बाशेओर मॅ काम करतॅ इ तॅला कुनॅतरी हांगीलता. तॅ शांती संवाद आन मुक्त विचार मंच याय दर आठोड्याला ऑनलाइन व्याख्यान हॉअ‍ॅसा तॅ तॅडॅ मा व्याख्यान ठवॅसा हॉता. पयल्या फोन मिंनॅ आमी खुब जुने मित्र हाव अह्यापरकारशी आमशी गट्टी जमली. खरा हांगो गा मा पॉटात फाळ आल्तॉ. तॅआ व्याख्यानात कुनॅ कय विसारला तॅ माला बरबर हांगता येदॅ गा, मा कय सूकॅसा नाय ना याई धास्ती वाटातोती. ‘उंदराआ पॉराला लॉखांडाअ‍ॅ व्यवार हांगीलॅ कुनॅ’ आहा कडॅ लोक बॉलद्यात गनी. पन जकल्याई माला हांबळॉन घॅटला माआ मोडकॅआ तॉडकॅआ कादोडीसा कव्तिक कॅला जॅनॅ माला बॅतान हुरुप आलॉ.

          कोरोनाबनॅ कुनाला भॅटता तॅ येत नॉता. तिगाळा मोबाइल आन लॅपटॉप मिंजॅ आपलॅ डॉळॅस. याव आदार घॅऑन मॅ फेसबुकवरशॅ कुपारी लेखक शॉदॉन काडलॅ. तॅँआ लिखान

जमा कॅला. तॅत माला कादोडी एकांकिका लिवनारॅपन भॅटलॅ पन सिरील मिनेझिस हारका लिखान जपवॉन ठवनारॉ, तॅआ हांबाळ करनारॉ बी कून लेखक माला भॅटलॉ नाय या वाईट

वाटातॅ. एकांकिका लिवनार्‍या कैकांना दोन तीन वहरे मांगॅ मांगॅ लागॉनपन, तॅँइ आज देतॅ-उद्या देतॅ आहा हांगात हांगात शेवटपोत एकांकिका दिल्योस नाय. एक दॉगाई कुरीयर कॅलॅ आहा पन हांगीला पन आजपोत माला कय कुरीयर पॉस्ला नाय. आमसा लिखान इला कादो दॅसा? ई कून आली आमश्या लिखानोर बोल्नारी आहा जर तॅँना वाटलॅ हायदॅ तॅ, तॅआं का सुकला? क्लेमेंट डिमेलो आन ईतर लॉकांइ तॅँआ बरास लिखान व्हॉट्सप वरनॅ धाडला. तॅत एकदोन एकांकिकापन होत्यो. मॅ युट्यूबवर अहलेल्यो एकांकिका शार-शारदा बगॉन, आयकॉन मंग लिऑन काड्ल्यो. तिगाळा माव जीव हॅवसॉधॉक जालॉ. ई जक्ला करता करता मॅ मा हरी कादोडीतुस बॉलॅशी आन माला अ‍ॅनारॅआ मेसेजला कादोडीत उत्तर द्याशी.

         शांती संवाद आन मुक्त विचार मंचश्या व्याख्यानाला बरॉ प्रतिसाद मिळालॉ. तॅतनॅस सामवेदी-कादोडी सब्दसूची तयार करॅशी कल्पना बॅतान जना डॉखॅतनॅ आली. मंग सामवेदी शब्दसूची नावासॉ व्हॉट्सप ग्रुप बनवीलॉ. मंग त्योर दर आठोड्याला एकेक सब्द घॅऑन तॅआ विषयी माइती (मराठीत अर्थ) जमा कर्‍या सुरवात केली. ई मा आब्यासाला जाम उपेगी पडला. यानॅ माला कादोडी सब्द कळॅ लागलॅ. आन मा विसारात भर घायली. जाम मजा याशी. अ‍ॅकास सब्दाला कॉडॅ अर्थ. जहॅ बोल तहॉ अर्थ. अ‍ॅका वस्तुआ वॅगवॅगळॅआ भागांना वायलॅ वायलॅ सब्द. जहा की केळीआ रॉपाशा अ‍ॅकालास  पोंगी, आंगाठ, खॉलॉ अहॅ सब्द आयकॉन-वासॉन माला तॅ आहा वाटातॅ गा कादोडी हारकी समृद्ध बी कुहनीस बाशा नाय.

         माआ संशोदन कामात तीन फादरांई माला जाम मदत केली. फा. फ्रान्सिस कोरिया अ‍ॅ तर माय मार्गदर्शकूस. तॅँआ सामवेदी बोली आन सामवेदी समाज या दोन पुस्तकाबिगर माऑ अब्ब्यास जालॉस नस्तॉ. मॅ खुपशा कुपारी सांस्कृतिक प्रोग्रामला जाशी. तडॅ  मॅ एक गानॉ नक्की आयकॅशी, ‘लीविती वाशिती ऑबाय माजे.’ माला ऑ गानॉ खुब आवडॅसॉ. माला कुनॅतरी हांगीला गा ऑ गानॉ फा. संजीवप्रसाद परेरा याई लीविलॅ. आतॅ तॅ आजारी अहतॅत, तॅँआ वय पन जालॅ. एक दि मनोर घॅटला आन फादरसॉ पत्तॉ शोदीलॉ आन पारल्याला पोसली. पयल्या खॅपॅत तॅइ माला कोडी माइती दिली. जोक कोडे हांगिले गा मॅ विसारातूस पडली. माला वार्ता करॅशी भारी होस भगून माई आन फादरशी पटकान दोस्ती जाली. (फादर आतॅ आपलॅत नात, पन तॅँआ आठोनीओर मॅ एक लेख लीविल्तॉ जॉ गॅल्या वहरा ख्रिस्तायनमिनॅ छापॉन आल्तॉ. आज फादरशी जाम खीत येतॅ.) फादर प्रसाद परेरा याई माला कुपारी उखानॅ, कान्यो, तॅइ लीवीलॅलॅ गानॅ अहॉ बरॉस ऐवज दिलॉ. फादर नेहमी मा काम कोडीपोत आला

याई सौकशी करॅशे. तहास फादर कोरिया पन नेहमी फोन करॉन विसरॅशे. तॅँव फोन आलॉ गा मॅ घाबरॅशी. पन तॅँई धास्ती माआ कामा करतास होती.

                  फादर ज्यो आल्मेडा याई पन माला कुपारी गानॅ दिल्तॅ. वसयश्या बर्‍यास लॉकांना माआ संशोदनाबद्दल माइत जाल्ता तॅ ते सॉताहून माला तॅआ लिखान धाडतोते. मा काम सॉप्पा हॉअ‍ॅसा तॅ आतॅ अड्सनीआ जाला. ऑब्डॅ लेख–कविता जमा जाल्यो. तॅतनॅ का टूकॅसा आन का ठवॅसा इस हुमजात नॉता. मंग मॅ ठरविला आन २०१९ पोत लीविलॅल्या लिखानातनॅ जा कय बरा लिखान हाय तास घॅसा. आन त्योर काम करॅआ सुरवात केली. मॅ निवडलेल्या लिखानाऑ अब्ब्यास सामाजिक, सांस्कृतिक आन बाशिक आंगानॅ अर्थ लाव्ना, तॅआ विश्लेशन आन तॅआ मॉजमाप अह्या परमानॅ कॅलॉ. इ काम वाटातॅ तॉडा सॉप्पा नॉतास पन जाम आवडॅसा. अब्ब्यासा निमतान मा मन या बाशेत गुतात गॅला. दरवेळी कयतरी नवा हापडॅसा तॅऑ आनंद जास्ती हॉतॉ. खरा हांगॅसा तॅ अर्थ लाविताना माला या बाशेआ सब्दसंपत्ती आन तॅआ ताकतीइ कल्पना आली. ऑ जक्लॉ सब्दसंग्रह करताना मॅ भारावॉन जाशी. उदारन दॅसास तॅ निहन–निहान, तळोर–तळ्योर, भगून-बगुन, बॅहॉन–भॅऑन, भेहली–भाहली, आहु–हाऊ अहया कॉडॅ तरी सब्दामिंसॉ फरक लक्षात घॅऑन अर्थ लाविताना नातॅ एकुस सब्द पन तॅसॉ वॅगवॅगळॉ अर्थ ध्यानात घॅऑन अर्थ लाविताना मॅ कादोडीश्या बुडा जा लागली. ऑ अनुबव जगा वायलॉय. गालिबनॅ हांगीलॅ परमानॅ, ‘ये आग का दरिया है बस डूबते जाना है !’ या बाशेत हांगॅसा तॅ ,’पानी ऑंडा हाय उपॅसॉ बास.’ 

         पीएचडी बोयला गा लॉँकां नंदर्‍या तारॅ दिखातॅत. ता बगॉनुस पीएचडी करनारॅला टेन्शन येदॅस. अब्ब्यासाऑ एक वायलॉस तान आहातॅ. पन माई बाजू बर्‍याई होती. माला कुहनॉस तान नॉतॉ उल्टॉ आनंद हॉतॉ. हुट्टीआ दिहापन मॅ खा-पॅसा हॉडॉन काम करीत बॅहॅशी. दिहाशॅ १२ तास कमी पडॅशॅ. राती २-३ वाजॅपोत काम करताना मॅ कुपारी सांस्कृतिक वातावरनात गडाप हॉयॅशी. या जकल्यात माला मदत करनार्‍या लॉकांव पन खारीऑ वाटॉ हाय. राती-पातेराती मॅ सॅबी, ख्रिस्तोफर, डिमेलोसर, सिरील, बर्नादेतबाय, वेरोनिका- बाय आन मॅक्सवेल यांना तरास द्याशी पन तॅइ कत्तॅस न शिडता-वैतागता माला मदत केली. याय आबार कुहनॅ सब्दात मानॉ.

         मा पेक्षा बीया लॉकांना माआ पीएचडीशी धास्ती जास्ती लाग्लोती. मॅ पीएचडी पुरी करनॅ गा नाय आहा तॅँना वाटॅसा. पीएचडी कर्‍या ऑडा टाइम लागाते? मंग कतॅ पुरी हॉअ‍ॅशी? अहे प्रश्न तॅँना पडॅशे. पन मॅ कत्तॅस भांबावली नाय. माआ नंदर्‍या समोर एक तारीक होती तॅआ आदी मा काम पुरा हॉनार ऑ विश्वास हॉतॉ. भगून मॅ आरामात, विहांबॉ घॅत मा काम कॅला. पन शेवटसॉ एक मयनॉ मिंजॅ घरात लगीन हाय तही गत. शारपास वॅळा ६४३ पानाऑ आख्खॉ परबंद वासॉन काडलॉ. प्रूफ वाशिताना मॅस चकित जाली. कतॅ कतॅ वाटॅसा इ जा का मॅ लीविलॅ

ता बरबर हायदॅ ना ? कतॅ कतॅ माला नवीन कयतरी सुशॅसा. मंग मा मार्गदर्शकानॅ माला हांगीला गा खरॉ संशोदक आपल्या कामाबाबतीत समादानी नहातॅ. तॅला नेहमी कयतरी नवा सुसतास आहातॅ. पन कडॅतरी थांब्या पाय. तुआ जक्ला काम भारी हाय. तॅत तुई मेहनत दिखातॅ. जिगाळा ऑ परबंद मॅ शेवटसॉ वासॉन काडलॉ तिगाळा माला पटलास नाय गा इ ऑडा मॅ लीविलॅ भगून..

         स परकरने आन परिशिस्ठ अहॉ ६४३ पानाऑ परबंद मॅ विद्यापीठात दिलॉ. मुंबयशा बारशा दोन तपासनीसाई तॉ एकदम खारॉन-खॉरॉन तपाशीलॉ आन साताठ मयनॅत रिपोट दिलॉ. तॉ गुप्त अहल्याबनॅ माला बग्या मिळालॉ नाय. पन माई मार्गदर्शक जाम खुश होती. ता बगॉन माला बरा वाटला. दुदात हाकर मिंजॅ मा वाडदिहास माई तोंडी परिक्षा होती. परीक्षेआ सुरवातीलास मॅ जकल्या कादोडीतुस स्वागत कॅला. परबंदाइ रशना-मांडनी कही  केली ता हांगीला.

         मॅ कॉडा अब्ब्यास केल्तॉ तॅअ‍ॅ फोटो, गानॅअ‍ॅ विडीओ पन तॅँना दावडलॉ.  तॉ बगॉन परीक्षक खुश  जालॅ. आन माआ वाडदिहाश्या दिहास माला डॉक्टरेट पदवी सन्मानानॅ दॅऑन टाकीली. मा वाडदिहासा इ खुब बॉठ्ठा बक्षीस हॉता. तोंडी परीक्षेला सॅबी, डिमेलोसर, ख्रिस्तोफर, सिरील ये माअॅ खांब माकरता उबी हॉतॅ. ‘नेहा बाय अबिंनंदन’ इ तॅइ हांगता खोटी माआ डॉळॅत आनंदाअॅ आहु आलॅ. कारन या माहनाई मानाई आन नात्याई ‘बाय’ इ उपादी माला दिली. माव जक्लॉ परवास, अड्सनी माला आठवात्योत्यो. मा मन माला बोयला, ’याचसाठी केला होता हा अट्टाहास.’

खरामिंजॅ हांगन्या हारका खुब कय हाय. पन जकलास हांगता येदॅ गा..? या परबंदानॅ माला बॅतान आनंद दिलॉ. समादान मिळाला. मराठीत हांग्यासा तॅ, ’मी ताणरहित अवस्थेत, आनंदाने स्वान्तसुखाय अभ्यास केला. याचं श्रेय माझ्या एकटीचं नाही तर मला मदत करणार्‍या प्रत्येक माणसाचं आहे. आपण मराठीच्या भाषाभगिनींचं साहित्य कुपारेतर समाजापुढे आणलं.’ या आनंदाबरबरूस माला बॉठ्ठा मायार मिळाला, इ कोडी बोठ्ठी गोष्ट. अर्थात माआ काम परिपूर्ण जाला आहा मॅ हांगॅ नाय. आन इ काम खपला आहा पन हांगता यासा नाय. तॅआ मीनॅ पन बारीकसारीक सुका अहनारूस. उलटा आतॅ या कामाला नवी दिशा मिळदॅ, तॅत वाड हॉत जायदॅ अही आशा हाय. या कुपारी समाजाऑ, बाशेऑ आन साहित्याऑ नवॉ इतिहास जिगाळा कतॅ लीविलॉ जायदॅ तॅत एक पान एक इट मा नावाशी अहनार ऑडास माआ करता लाखमॉलाआ समादान.