दादीआ मामारा लगीन हॉता. तीआ मामबाहाशा नातनीआ लगीन. खरा मिनजॅ ऑड्या लांबशा नात्यात मॅ लग्ना-बिग्ना जाय नाय. पन दादी हांगातॅ तुआ लग्नाला ते जकले आलते. माला वरमायसॉ अयेर हाय. त्याइ माला भारीपैकी मोरपिशी लाउसपीस दिलता. तुइ अयेरायी डायरी बग. त्यातपन, पन्नास-शंबर रुपय अयेर लीविलॅलॉ हायदॅ. तू जाय मिनजॅ जाइस. आपल्याला अडॅ हाकोटे जिव्या का कॅलता त्या हांजशापारा यॅद रॅ नाय, अन या बायकांना पंचवीस वहरा आदी कुनॅ आपल्याला कुहन्या रंगा ब्लाउस पीस दिलता ता काहा आठवातॅ कुना गाई.
हांच्यापारसॉ प्रोग्राम हॉतॉ. अयेरा पाकिटात पाचशे रुपय घायलॅ. पाकिटोर दादीआ नाव लिवीला. बाईक घेटली अन निंगालॉ. लग्ना रिसेप्शनसॉ प्रोग्राम दोपारा अहलॉ गा जरा बरा आहातॅ. दोपारा बारा तॅ तीनपोत लोक वाटला गॅल्यामुळॅ एकास टायमाला घनी गर्दी हॉयॅ नाय. पन हांच्यापारसॉ प्रोग्राम अहलॉ गा जकल्यांना आठ वाजता पॉसॉन, अयेर घालॉन, जीवॉन, नव वाज्यादो कडीला हात पुहीत घारा जाशी घाई आहातॅ. त्यामुळॅ आठ तॅ नव या टायमात लग्ना मांडवात हातोर हात आन पायोर पाय अही परिस्थिती आहातॅ.
मॅ पॉसलॉ. रस्त्या मॅरॅला स्कुटर ठव्यापन जागा नोती. एक बाइक जुरुक खशविली अन त्या मिनॅ माइ स्कुटर घुशविली. मांडवात गॅलॉ. बगीतॅ तॅ नवरा-नवरीला शुभॅच्छा द्यादो अन अयेरादो भोट्ठी लांबी लाईन लागलोती. एका मॅरॅ ड्रिंक्ससा काऊंटर हॉता. तडॅ बाइमीनॅ पानी डोंबिल्यॉर मावरा उमातॅ ताहा लोक उमालता. जीवना करता शार-पास काऊंटर अहल्या मुळॅ, त्यातशा त्यात जीव्यादो कमी गर्दी दिखातोती. घरनॅ निंगालॉ तिगाळा मॅ मनातशा मनात एखाद दुहरॉ पेग मारॉन, मंग जिवॅ अहॉ बेत कॅलतॉ. पन ड्रिंक्सशा काऊंटरवर गर्दी बगॉन अन दुहऱ्या दिहा कामोर जासा हाय ऑ विसार करॉन मॅ दारूऑ प्लॅन कॅन्सल करॉन जीवना लाईनीत जावॉन उबॉ रॅलॉ.
लाईनीत मा पुडॅ एक कॉलेजवयीन पोरी उबी होती. पायात हाय हिल्स अन आंगात सलवार कुर्ता घायलेली. माथा मोकळा होडलेली. हलकॉसॉ मेकअप केलेली.
वॅळापारा आपल्या हाताय, तोंडोर यॅणारी माथ्याइ बट मांगॅ करणारी. तिनॅ मांगॅ वळॉन माओर बगीला अन स्माईल दिला. ती पोरी डिट्टो सरिता दिखातोती. तीस वहरा अगोदर मॅ कॉलेजमीनॅ शेवटशी बगीलती तहिच्चे तही सरिता. माला रॅवाला नाय. मॅ तिला विसारला, “तू सरिताइ पोरी गा?” ती हांगातॅ “हां”. आमसा बॉलना आयकॉन, लाईनीत तिआ पुडॅ उबी अहलेली ती मम्मी मागॅ वळाली. तीस होती ती.. सरिता… ऑड्या वहरानंतर सुद्दा सहज ओळखणे- बल… फार कय बदलली नोती. तरुणपणी होती तहीस कॉन्फिडन्ट, ग्रेसफुल, डिसेन्ट, स्लीमट्रीम. आज ती तिगाळ- शा पेक्षा जुरुक घनीस मॅच्युअर्ड दिखातोती. किमतीनॅ भारी पन सोबर कलरशी साडी, शरीर प्रदर्शन हॉणार नाय अहा ब्लाउस, काना-गळ्यात मोजकॉ दागिनो, माफक मेकअप, तास जुना ओळखीआ कातिल स्माईल, सगळा तिला अन तिआ स्वभावाला सॉबॉन दिखणारा!
“तू! ऑड्या वहरान? हॉतॉ कडॅ?
तिआ ओठोर-सा स्माईल, बॉलण्याशी मिठ्ठास, अन डॉळ्याशी चमक यात जुनी ओळख अन आपले- पणा दिखातोतॉ. तिनॅ हात हातात घॅवॉन माइ चौकशी केली. लाईनीत उब्या उब्यास कॉलेजशॅ दि रिवाईंड करॉन जालॅ. टाळ्यांय, पापोळ्याय झँडॅ फडकावॉन जालॅ. पोरे किती? करत्यात का? बायकू, नवरॉ, नोकरी, घर, अल्लामत चौकशी करॉन जाली.
ऑड्यात आमे जीवना काऊंटर पोत पोसले. तिनॅ प्लेट टुकीली. टिश्यू पेपरनॅ पुहील्याघती केली अन मा हाता दिली. अन मग सवताकरता प्लेट घेटली. मग सरिता, तीइ पोरी लॅरिसा अन मॅ आमी तिगे एका मॅरशी जागा पकडॉन जिव्या बॅहॅलॅ. का का विषय निंगाले अन आमे का का बोयले, कोडे हावले अन आमे जीवतॅ हाव तव आमशा मॅरनॅ कोडे लोक जीवॉन उठॉन गेले ता आमशा आमाला पान माइती नाय. जिव्यादो चिकन-मटन हॉता गा दंडुइ भाजी इ माला कुनॅ विसारलोसा तॅ माला हांगता आला नसता. लॅरिसा पन आमशा गप्पांत सामील जालती अन मनापासून आमसा बॉलना एन्जॉय करतोती. जीवॉन उठले अन वॉश बेसिनपा हात धव्या जातोतॅ
तिगाळा लॅरिसा बोयली “अंकल, तू आवडलॉ माला. एक दी घारा ये. आपुन जाम गप्पा मारॉ, धम्माल करॉ”
आमे जिवले तव अयेराइ लाईन कमी जालती. आमे तिगी एकत्रस स्टेजवर गेले. नवरा-नवरीआ अभिनंदन कॅला. नवरा-नवरीआ दोन मॅरॅ उबी रॅवॉन फुटू काढलॉ.
एक अख्खॉ तास शून्य मिनटात खपलॉ. मोबाईल नंबरशी दॅवानघॅवान जाली. निघताना सरिता आणि लॅरिसा दोघांसोबत हलकीशी गळाभॅट जाली. पुन्हा ठरवॉन भॅटयाशॅ वायदॅ जालॅ. शरीराला, मनाला, काळजाला कुनॅ तरी कातकुल्यॉ खावडल्या घती वाटातोता.
त्यास तंद्रीत घारा गॅलॉ. बेल वाजविली. बायकूनॅ दरवाजॉ उघडलॉ. आज लग्नाला ओडे वहरे जाले तरी बायकूपासून कय लिकव्याशी कला माला अजून जमली नाय. मा तोंडोर बगॉन ती बोयली, “आज हांग्या हारकी किंवा लिकव्या हारकी कय जिनक घडले वाटातॅ”. आहा बॉलॉन ती खुद्कन हावली. ती हावली गा ओडी भारी दिखातॅ की आपुन मनातशा मनात का स्टोरी बनविलॅ हायदॅ त्या स्टोरीआ सुमाळना ऑहॉन जातॅ.
मॅ कय न बोलता घरात गॅलॉ. कपडे बदलले. हातपाय धविलॅ अन यॅवॉन हॉल मिनॅ सॉफ्यात बॅहॅलॉ. बायकूनॅ हाता गराम गराम कॉफीआ कप दिला अन सवता हाताव टी करॉन माला हांगातॅ, “बॉल आतॅ ….”
मॅ, जा का जालता (माला मनात का वाटला ता हॉडॉन) जाहाच्चे ताहा बायकूला हांगॉन टाकीला. कॉलेजमिनॅ असताना जालेली मज्जा. मित्रा बरबर मारलेली पैज. घाबरात-घाबरात तिला ‘मा बरबर कॉफी प्या येता गा’ विसारलोता ता. “सल” हांगॉन ती बिनधास्त मा बरबर हॉटेल ऋषिकेश मिनॅ आलती ती. “तू तुआ मित्रा बरबर माला कॉफीला घॅवॉन जाशी पैज मारले ता मॅ आयकिलॅ. अन तू हरलॉ पा नाय आहा माला वाटातॅ. भुगुन मॅ तूआ सोबत आले.” तिनॅ मस्तपैकी आव्हात आव्हात हांगीला. जाताना बोयली की, “तू खूप सज्जन पॉर हा. ऑहॉस रॅ. अभ्यासोर अन करियरवर लक्ष दे.” माला का बॉल्यासा तास सुसला नाय. मॅ एकशिती टेबलोर बॅहॉन रॅलॉ. मेदू-वडा अन कॉफी घेटलोती त्या बिल पन तिनॅस दिला.
बायकू माकून एकदा मनापासून आव्हली. मंग मा गालूटाला शिमटॉ काडीत बोयली, आतॅ तरी ओळख… ओळख तिला अन तुला सवताला पन! कॉलेजशा दिहात कॉड्या डिसेंन्टली तिनॅ तुला नकार दिलॉ अन आज कॉड्या सहज तिनॅ तुला मित्र म्हणून जवळ कॅला इ बग. तू अजून गर्लफ्रेंड म्हणून तियेस स्वप्ने बगिता हायदा तॅ याव अर्थ ऑडॉस की तुला अजून तीइ ओळख पटली नाय. कॉलेजशा
दिहात ती तुला पटली नाय या कॉम्प्लेक्स मिन्ने बार ये राजा. अन या वयात एक खूप भारी, मॅच्युअर्ड मैत्रीण मिळाले यात आनंद मान.
दोनेक मिनिटे पॉझ गॅलॉ. कुन कइस बोयला नाय.
बायकू पुडॅ बोयली, “खरा हांग, तीऑ नंबर तुआ मोबाईल मिनॅ का नावानॅ सेव्ह कॅलॅ?”
मॅ कइस बोयलॉ नाय, नकळत माइ जीभ साविली.
बायकूनॅ मा हातसॉ फोन घॅटलॉ. त्यामिनॅ रिसेन्ट डायल्ड नंबर हॉतॉ ‘संतोष इलेकट्रीशन’. ता नाव एडिट करॉन तिनॅ “सरिता” नावानॅ सेव्ह कॅला.
व्हाट्सऍप मिनॅ गेली. अन मा वतीनॅ सरिताला एक मॅसेज लिविलॉ, “आज कित्येक वर्षांनी तुला भेटून खूप खूप आनंद झाला. कृपया येत्या रविवारी सहकुटुंब आमच्या घरी जेवायला या. माझ्या बायकोला देखील तुम्हाला भेटायला खूप आवडेल.” फोन मा हातात दॅवॉन माला तॉ मॅसेज सेंड कऱ्या हांगीलॉ. मॅ मॅसेज धाडलॉ. शून्य मिनिटात त्याला ब्लू टिक, सव्वा सेकंदात त्यावर हॉकार कळविणारॉ मॅठॉ अन पावणेतीन सेकंदात “नक्की येतो” आहा उत्तर आला.
मॅच्युअर्ड मैत्रिणी लाख मिळद्यात पन ओडी मॅच्युअर्ड बायकू मिळ्यादो भाग्य लागातॅ. माला मा बायकूआ जाम कौतुक वाटला. मॅ माला जमॅदॅ तॉडा गॉड स्माईल दिला. अन ती पंचेचाळीस वहराइ बावली खिदळया लागली. ओळख पटली!