वसय तालुका ऑ सागर, आगर, नागर आन डोंगर यामिनॅ विभागलॉ गॅलॅ. वसयला दक्षिनपासून लागला तॅ उत्तर दिशापोत बॉठ्ठॉ किनारॉ मिळालॅ. ३११ किलोमीटर परिसरात पसारलॅल्या वसयमीनॅ समावेदी बामन, कुपारी, वाडवळ (ख्रिस्ती-पानमाळी), कोळी, भंडारी आन ईस्ट इंडियन लोक रॅतॅत. वसयश्या कुपार्यांना जाम बॉठ्ठॉ इतिहास हाय. वहरा भाशेत हांगॅसा तॅ जवळपास पास-सशे वहराव इतिहास हाय. मूळ समावेदी बामन समाजातनॅ वायलॉ जालॅलॉ समाज मिंजॅ कुपारी ख्रिस्ती समाज. तॉ वायलॉ कदो आन कॉहॉ जालॉ ऑ एक वायलॉस विशय हाय आन त्याबाबतीत वायल्यो वायल्यो कान्यो हात. तरीपन बामन आन कुपारी याई भाशा, संस्कृती, सालीरीती थॉड्याफार परमानात हारक्योस हात. काळ बदलात गॅलॉ आन शिक्षान आन बारश्या देशाई संस्कृती-पॉशाक याव परीनाम यामुळे कुपारी आन बामन या दोन समाजाआ खानॅपॅनॅत राअनीमानात बॅताम फरक पडलॉ.
सादारन ५०० वहरा आदी पोर्तुगीज लोक भारतात आले आन तॅइ क्रिस्ती धर्माऑ प्रसार कॅलॉ. तिगाळा भारताशा किनार्योर रॅनारॅ कय लोक क्रिस्ती जाले. पायलॅँदा पोर्तुगीजानॅ क्रिस्ती लॉकां शिकशानाओर लक्ष दिल नाय तॅ निखाळा धर्म शिकशान द्यासा काम कॅला. तॅना जाम श्रद्दाळु बनविला. फादर आन बायबलश्या हिकवीनॅऑ परिनाम हॉवॉन तॅ सादॅ, भॉळॅ, समंजस, शांतीप्रिय आन इमानी बनलॅ. पुडॅ इंग्रज भारतात आलॅ तॅई शिकश्ंनाव परसार कॅलॉ. याबाबतीत आपल्यो क्रिस्ती संस्था पन मांगॅ रेल्यो नाय. तॅई पन ‘चर्च तडे शाळा’ आहा धोरन ठविला आन तिगाळ पासून क्रिस्ती लॉँकां खर्या प्रगतीला सुरवात जाली. तिगाळा कय चर्चशा दरी जागा होती तॅ शाळीकरता बिल्डिंग नोती. दरी पैशॅ नॉतॅ. पॅरिशसा लोक गरीब. पन तिगाळशॅ गॉयानीस फादर मुंबयला गॅलॅ. कय लॉकांना भॅटलॅ. तॅआ दरनॅ पै-पै मिळाली ती गॉळा केली. गावशा लॉकांई मेहनत केली. शाळा ऊबी केली. आतॅ शाळीत हिकॅदो पोरे कडशे हाडॅशे.? मंग फादरनॅ पॅरिशसा हिकलॅल्या लॉकांना हाथा घॅटला. तॅई गावात दारोदार फिरॉन पोरे गॉळा केले. तॅँना आब्यासाई गोडी लाईली आन अस्ते अस्ते गाडी रुळोर आली.
मंग कुपारी लॉकांई मांगॅ वळॉन बगीला नाय. अशिकशीत बयबाबाला सुदा शिकशना महत्व कळाला. तॅई पॉटाला शिमटॉ काडॉन पॉरांना हिकविला. पोरे हिकले. बोठ्ठे जाले. कामाला लागले. हाथा पैसॉ या लागलॉ. मंग याई तॅँआ पॉरांना कॉन्व्हेंट शाळीत घायला. तॅआ करता हिकवनी ठविली. ये पोरे तॅ आपल्या आयबापापेकशा हुश्शार निगाले. कून डाक्टर, कून इंजिनियर, वकील जालॅ. तॅ कून सीए जालॅ. पत्रकार-लेखक जालॅ. शित्रकार जालॅ. IAS आन IPS हांगडा होडला तॅ बाकी परतेक ठिकानी कुपारी पॉसले नात आहा जाला नाय. शिकशना बाबत इतर समाजाला मागॅ टाकॉन कुपारी समाज बॅताम पुडॅ निगॉन गॅलॉ. नंतर नंतर तॅ शिकशान घॅआ बार दॅशात पन
गेले. तडे वरसा शिकशान करॉन तडॅस रॅलॅ. नुसतॅ पॉर नाय तॅ पोर्यो पन बार दॅशात शिकशान घ्या जा लागलॅत. जगाआ पाठीओर अहो देश नाय जडे कुपारी नाय. समाजात न हांगता यासॉ ऑडॉ बदल जालॉ. बयबाबाइ कमाऑन बांदलेले भोट्भोटे घरे आतॅ ओस पडॅआ लागले. अस्ना बॉठ्ठा घरात डॉकरॅ-डोकरीस रॅआ लागले आन घर तॅना खा लागला.
दुखाई बाब मिंजॅ हुशार पोरे बार दॅशात जा लागलॅबनी आन तॅत घरात एकुस पोर नातॅ पोरी याबनी उत्तर वसयशा कुपारी समाजाई लोकसंख्या दिहोनदी कमी हॉव्या लागले. तॉ दी लाम नाय गा कुपार्याई गत पारशी समाजागत हॉऑन आपल्या वाडवडलाई बांदलॅलॅ बंगलॅ ओस पडॉन रॅनार नंतर परप्रांतातनॅ आलेला लोक आपली जमीन कहीता कहीता बंगलॅत पन रॅआ लागॅद्यात. पन तॅआहून बॉठ्ठॉ परिश्न अहॉ हाय गा डॉकरॉ-डोकरी हांबाळ कुनॅ करॅसॉ.? डोख्योर छप्पर, घरात सोईसुविदा, खिशात पैशॅ हात पन आंगा दुखनॅखूपनॅला जवळसॉ माहनू लाम बार दॅशात ! मंग का करेसा..? उपाय एकुस नाईलाजानॅ धाडॅशे हांगा गा ठवॅशे हांगा डॉकरॉडोकरी वृद्धाश्रमात. कैक वहरान वृद्धाश्रमात पन जागा मिळदॅ गा नाय ई पन हांगता यासा नाय.
मंग योर उपाय एकुस समोर येतॅ तॉ मिंजॅ पयल्यान ‘चर्च तडे शाळा’ यानुसार आतॅ “चर्च तडे वृद्धाश्रम” इस धोरन राबव्या लागॅदॅ. उत्तर वसयश्या निर्मळ, नंदाखाल, आगाशी आन बोळींज हारक्या पॅरिशमिनॅ वृद्धाश्रम सालू कर्या लागॅद्यात. ई शित्र आतॅ जरी ‘ई जरा जास्तीस जाला’ आहा वाटात अहला तरी अॅनार्या काळाई ती गरज हाय. आत्तॅश्या वरिष्ठ मंडळीनॅ मना ई तयारी करॉन ठव्या पाय. पुडॅ अॅनारॉ काळ आन त्यामुळॅ हॉनारी परिस्थिति कठीण हॉनार हाय. तॅला इच्छा अहो गा नहो पन तॉँड दॅना भाग हाय. पन धीर हॉडॉ नाका. संत तुकारामनॅ हांगील्या परमानॅ –
आलिया भोगासी असावे सादर
देवावरी भर घालूनिया
तोची कृपासिंधू निवारी साकडे
येरे बापुडे काय रंक
बी आपल्या हाथा कईस रॅनार नाय. नुसतॉ देवोर विस्वास ठॉअॅसॉ. कारन तॉस आपला संकट दूर करनार हाय. आपला तारन करनार हाय.