फॅमेली पेन्शन – फ्रान्सिस डिमेलो, दोनतलाव
‘खप खप खपलॉ आन मातीआ पुंज्योर बॅहॅलॉ. का कमायला ? तिगाळा शाळा होडली नसती तॅ आज दोन पैशॅ पेन्शन खाओता गा नाय.’ शिजूऑ ऑ लाहा सालुला कय नवॉ नॉतॉ. आयकॉन आयकॉन सालुअॅ कान किटलोतॅ. तॉ अॅका कानाय आयकॅसॉ आन बीआ कानाय हॉडॉन दॅसॉ.
पन खरा हांगॅसा तॅ शिजूआ बॉलनॅला कय सार नॉतॉ आहा नाय. सालु, शिमू आन कतीऑ जकल्यात बॉठॉ पॉर. शिमू आन कतीला पास-स वहरोर जालॅलॉ बाबू मिंजॅस सालु. शिमूऑ तिगाळा सलतॉ वखत हॉतॉ. गॉठॅत आठ-दा भई. दुदाऑ पास. तीन-शारशे केळीऑ दंदॉ आन वहरीभर पुरदॅ ऑडा भात हॉतॅ. कळंग्यात दानॉ हॉतॉ आन हाता नानॉ हॉतॉ. गावकॉठारीत हयर्या पावनॅत शिमूला बॅतान मान हॉतॉ. घरात सालुअॅ पक्कॅ लाड हॉअॅशॅ. सालुआ पाठीओर कतीशिमूला दोन पोर्यो जाल्यो आन तॅआ मांगॅ दोन बी बाबू जालॅ. बॉलता बॉलता घर भरला. संवसार वाडलॉ तहॉ खर्ससुदा वाडात गॅलॉ. त्योरनॅ शिमू आन कती मीनॅ खटकॅ उड्या लागलॅ. घराशी शांती जरा कमी जाली. कतीऑ लानॉ बाहा कतूआ बेनीआ संवसारोर लक्ष हॉता. अडल्यापडल्याला, आव्नी आन लानी बान्नीला मदत करॅसॉ.
मुंबैला आरे कॉलनीसा बाटल्या दुद या लागला. तॅ शिमूये कय गिराके हुटले. मंग तॅनॅ अॅका इरानॅआ हॉटेलात उकडॉ सालू केलो. पन तॉ इरानी पक्कॉ कडाक. पानी घनॉ सलॅसॉ नाय भगून शिमूइ जाम रगाजळ हॉअॅशी. तॅत तॅइ स मैनॅ एक भय गापटाली. आन एक बारदानी भय वॅताना तिला भांडा आला. दुस्काळात तॅरावॉ मयनॉ हांगातॅत ताहा जाला. गटारी अमावस्याला बोठी वारमोड जाली आन भादवाडीऑ दोनशे केळीऑ भाग आडवॉ जालॉ. थोडकॅत शिमूऑ संवसार आडवॉ जालॉ. भयसॉ दंदॉ भॅहॅलॉ आन केळीऑ ताफॉ आडवॉ जालॉ. घरात तानओड हॉया लागली. तॅत कमी भगून शिमू कुना नादी लागॉन हाकाळ हांज नवटाक-पावशेर घ्या लागलॉ.
दिहोन दि शिमूआ प्या सा वॅसान वाडातुस गॅला. कती कय बोयली बास गा तॉ तीआओर हात टुक्या लागलॉ. पोरे जक्ले लाने. बाप पॅऑन आलॉ गा सश्यागत घाबरॉन कडेतरी नीकॉन बॅहॅशे. शिमूयो हाकाबोटश्यो गाडयो सुक्या लागल्यो. पैल्या गाडीला जानारॉ शिमू शार-साडेशारशी गाडी पकड्या लागलॉ. तॅआबनी गिराके हुटया लागले. कावडीशे भांडे कमी कमी हॉत गेले. आन गॉठॅतश्यो भई पन एकेक करॉन कमी हॉत
गेल्यो. एक दि शिमूनॅ कावड खांदयोरनॅ काडॉन खुटीला टांगविली ती कायमशी.
कती बिशारीऑ जीव खाला वर हॉया लागलॉ. पदरी लाने पास पोरे. नवरॉ बॅब्दाड. भाटातसॉ दंदॉ पयल्यान हारकॉ रॅलॉ नाय. जकल्या बाजूनॅ ऑडतान. पन तीनॅ हिम्मत नाय होडली. तीनॅ लोद साफ कॅलॅ. वांगे, दुदी आहा लावीला आन ती रॉज हॉपारशा बजाराआ जा लागली. सालु तिला मदत करॅआ लागलॉ. हळूहळू जक्लो संवसार कती आन सालुआ जिवोर पडलॉ. सालुइ शाळा मीनॅ मीनॅ बूडॅ लागली. शिमू हाकाळ-हांज बक्काट पॅऑन यासॉ. कतॅ जीवलॉ तॅ जीवलॉ नातॅ तॉहॉस नीजॅसॉ. बगॅ तिगाळा शिमूये तंगडे उपर.!!
हाकाबोठे हाकाबोठे शिमूआ हातापायाला कापरी हुटया लागली. शिमूआ आतॅ कय खरा नाय इ जक्लेस हुमजाले. सालुला बो कय कळात नॉता पन कती का हुमजॅसा ता हुमजाली. तिआ जीवाला घनॉस घोर लागलॉ. शीमुला दोन तीनदा इस्पितळात ठोईला. कतीनॅ आशॅआशॅनॅ सगळा कॅला. बॅतान पैसॉ खपवीलॉ. तीऑ बाहा कतू तिआ मांगॅ उबी रॅलॉ. पन उपेग कय जालॉ नाय. शिमूआ पॉटात एक हारको पानी हॉया लागलॉ. तिगाळा शिमूअॅ डॉळॅ उगडलॅ तवपोत उहुर जाल्तॉ. हातसा जक्ला गॅलता. डाक्टरनॅ शेवटसॉ पानी काडलॉ तिगाळा स्पष्ट हांगीला, ‘अहो ताई, कशाला पैशे वाया घालवता आणि त्रास करून घेता काही फायदा नाही. आता परत आनू नका. त्यांची प्यायची इच्छा राहिली असेल तर पिऊ दे त्यांना.’
घारा हाडलॉ आन शार दि नाय जालॅ आन एक दि हाकाबोठेस शीमुला रक्ताई बोठी वांती जाली आन शिमूनॅ कायमशी मान टाकीली. कतीआ पदरी पास पोरे आन डोख्योर कर्ज करॉन शिमूनॅ पन्नाशीआ आतुस आपलॉ कारबार आटपीलॉ.
शिमू गॅलॉ तिगाळा सालु सादारन सवदा वहराव हॉतॉ हायदॅ. आठवीत हॉतॉ. तहीबही वार्शिक परीकशा दिलती. पास जालॅ गा नापास ता बगॅपन शाळीत गॅलॉ नाय. तॅनॅ बाबाआ कावडी बाजूला शाळीसा दफ्तर अडकविला ता माकून कय काडॅ गॅलॉ नाय. आठवीतनॅस सालुइ शाळा हुटली. सालु शाळीत घनॉ हुशार नहलॉ तरी नापास कतॅ जालॉ नाय. बी मिंजॅ आंगाखांद्याय भरलॅलॉ हॉतॉ तॅबनी तॉ शाळीआ कबड्डी मीनॅ तन हॉतॉ. पन आतॅ जक्ला खपला. परिस्थितिनॅ तॅआ लानपन खपविला. तॅला एकदम बॉठा हॉया लागला. कतीला तॅऑस तॅ आदार हॉतॉ. लोक का बॉलदॅत याऑ घनॉ विसार न करता कतीनॅ दुख हॉडॉन माकून बजार सालू कॅलॉ. वारमोड जाल्योर तीनॅ अॅका टॅपराला कागडॉ लाविलतॉ. तॉ थॉडथॉडॉ सुरू जालॉ. तॅआ बरबर तीनॅ तुळस आन सब्जॉ लाविलतॉ. सालुआ मामूऑ भाजीपाल्याऑ बॉठॉ दंदॉ हॉतॉ. मॅरदॅरशा लॉकांय वांगे, दोदी, शिराळॅ, गलकॅ, भेंडॅ ऑहॉ जकलॉ माल तॅआ दरी यासॉ. तॅनॅ सालुऑ एक पास काडलॉ आन तॅला बरबर मुंबै घॅऑन जा लागलॉ.
एक दोन मयनॅत सालु बर्यापैकी पहाटलॉ. घरसॉ कागडॉ वाड्या लागलॉ तॉहॉ कतू मामूनॅ सालुला फुलाऑ पास काडॉन दिलॉ. सालु रॉज पैल्या गाडीनॅ दादर फूल बजारा जा लागलॉ. कागडॅआहरी तुळस, सब्जॉ, झिपरीऑ पालॉ आहा जा मिळदॅ ता घॅऑन जा लागलॉ. हाथा रॉजसॉ पैसॉ या लागलॉ. सालुऑ धंदॅत बर्यापकी जम भॅहा लागलॉ. मॅरदॅरशॅ जक्ले तॅलास कागडॉ, जर्मन तन द्या लागले. सालुआ ओट्योर कागड्याइ अस्नि बोठ्ठी राहा पड्या लागली. कागडॅयो पुडयो बांदोन सालुआ कमरॅऑ काटॉ एक हॉअॅसॉ. लान्यो बेंनी आन बाहा तॅँना जमॅदॅ तही मदत करॅशे. खॉलॅ नीट करॅदो, कागडॉ जॉखॉन दॅदो आन कंडे भर्यादो हात लाव्याशे. पन सालु मिंजॅ तॅँव अन्ना तॅँना हांगॅसॉ, ’मरे, नाताल, इनुस आन विजू तुमशी परीक्षा जवळ आले ना, तुमे जा बगु अब्ब्यासाला. मॅ एक हिकलॉ नाय पन तुमे तरी बरे हिका. मॅ आन कती हाय आन काम हाय. आमे बगीतॅव.’ शारू भावंडांना सालु बद्दल आदर हॉतॉ. ते कतॅस सालुआ शब्दाआ बार जात नोते.
शार पास वहरात सालुनॅ धंदॅत जम भेवीलॉ. व्यवारात एकदम चोख अहल्यानॅ जक्ला लोक तॅलास माल द्याशे. एक नवॉ पैसॉ सुदा अडसॉ तडे जासॉ नाय याइ खातरी होती. मेहनत आन ईमानदारीओर धंदॉ वाडलॉ. तॅआस बळोर सालुनॅ कर्ज फेडला. घर पन मॅरदॅरनॅ वाडविला. घरात संडास बांदीला. गोबरगॅस बांदिलॉ. शारू बाहाबेंनी शिक्षनाला कयूस कमी पडॉन दिला नाय. लान्या विजुला तॅ इंग्लिश शाळीत हिकविला.
सालु एकोणीस वीस वहराव असतास तॅला निरोप येतोतॅ. कतीला सुदा उतळी पडलोती. बी मिंजॅ तीआ बळॅ आतॅ पयल्या हारका काम हॉत नॉता. हाकर वाडातोती. कतॅ भुं ऊकातोती. बगुन ती सालुआ मांगॅ लाग्लोती. पन मेरी आन नाताल सा डी एड सा शिक्षान पुरा जाल्याबिगर लगीन करॅसा नाय आहा तॅनॅ ठरविलता. त्यो डीएड ला दुहर्या वहरा असताना कतीनॅ जी पोरी बगिली ठरविली तीआहरी मिंजॅ शिजूआहरी सालुनॅ थोडकॅत लगीन कॅला आन संवसारात पडलॉ.
शिजू घनी हिकलेली नोती पन व्यवारी होती. कामात वाग होती आन बॉलॅ-सालॅआदॉ बरी होती. जक्ल्यांना मान दॅऑन मीळॉन मिसळॉन रॅतोती. सालुआ घारा जहनी माव्ली आल्ती. शिजूला एकमेकीआ पाठीओर दोन पोर्यो जाल्यो. ताहा सालुनॅ हळुसकन जाऑन अपरीशन करॉन घॅटला. पोर्यो बोठ्ठ्यो होयात तव बेनी लग्नायो जाल्यो. दोगींना बर्यो शाळा मिळाल्त्यो. तॅतॅन दोगींना बरॅ नवरॅ मिळालॅ. तॅँआ तॅँइस जमविला. सालुनॅ दोगींय लग्ने धूमधडाकॅत केले. सालु आन कतीआ डोख्योरसॉ एकेक भार कमी जालॉ.
इनुस ग्राज्युएट जालॉ आन तॅला इन्कम टॅक्स आफिसात नोकरी लागली. मागोमाग विजू सीए जालॉ. दॉगाय शीक्शने सालुनॅ केले. दोगी मार्गाला लागलॅ. पन इ बग्या कती
रेली नाय. तीइ हाकर वाडातुस गेली आन तॅत एक दी अटक अॅऑन कती दॅवाश्या दारा गेली.
इनुस आन विजू मागोमाग लग्नाअॅ जालॅ. पन सालु आन तॅआ दॉगाय संवसार अॅका घरात कहॅ अरगॅशॅ? भगून सालुनॅ पुडाकार घॅतलॉ. तॅनॅ कतू मामुला बोलविला आन तॅआ समोरूस इनास आन विजूला वायले घरे बांदया दोन टेपरे बॉठ्या मनान दॅऑन टाकिले. ऑडास नाय तॅ शंबर दीडशे पिडी कागडॉ होतोतो तॉ कागडॉ कापॉन टाकीलॉ. दोनू बाहाइ अस्ने बोठ्ठे घरे बांदीले. ते कामोर जाशॅ तॅ सालुस जक्लि देकरेक करतोतॉ. कय हाड ने तॅनॅस केली. सॉता घरापरमानॅ जक्ला कॅला. कागडॉ कापीलॉ आन सालुआ पैशाव मार्ग बन जालॉ. तॅनॅ फुलाऑ पास बन करॉन तॉ घारा बॅहॅलॉ.
सॉताआ पोर्याये शीक्शने सालू होते पन सालुला घनी काळजी बाहाश्या घराइ होती. दॉगाय बंगलॅ जालॅ, लग्ने जाले तिगाळा कडे सालुऑ जीव हॅँवसॉधॉक जालॉ. दोनू बेनी आन दोनू बाहा एकदाशॅ संवसारा मारगाला लागलॅ तिगाळा सालुला आहा वाटॅ लागला जहनी जन्मा आल्या सार्थक जाला. तॅनॅ फुलाऑ पास कायमसॉ बन कॅलॉ. तॅनॅ जक्ल्यो पागो रानोर टाकील्यो आन तॉ एकदम सुशॅगात जालॉ. हाकाळ-हांज लीगरी लीगरी घ्या लागलॉ. पोर्यो बोठ्यो जाल्यो. घन्योस नाय पन हारक्यो-हुरक्यो हिक्ल्यो. तॅय लग्ने जवळ आले पन इनुस आन विजूनॅ तॅत घनास कय लक्ष घायला नाय. तॅ, तॅयो नव्यो नवर्यो, नवे हयरे-दोयरे आन नव्या संवसारात ओडे गुतलोते गा आपल्या अन्नाआ काहा सल्ले, तॅआ पोर्यां काहा सल्ले याइ कैस परवा नोती. कतॅ विसारला पन नाय. जॅआ अन्नानॅ आपल्याकरता तॅइ आख्खी हयात घालविली, तॅला कय अडसन हाय गा, कय कमी जास्ती पडातॅ याव विसार सुदा तॅँइ कतॅ कॅलॉ नाय.
सालुऑ पास बन जालतॉ. पोर्यांय लग्ने आल्ते. खर्स हॉतॉ पन तॅनॅ तॅआ बाहापुडॅ हात नाय पसारलॉ. तॅनॅ आन शिजूनॅ कहीतरी हांदहुंद करॉन पोर्यांय लग्ने पार पाडले. इनुस विजूनॅ आंहातांहा थॉडाफार बगीला नाय आहा नाय पन तॉडॅपुरतास.
वयाश्या सौदा वहरापासून सालु कुटूमाकरता झिजलॉ. बाहाबेनॅआ हारकाहुरका कॅला. बारोजी तॅ केली नाइस पन बाहाबेनॅकरता सॉताऑ संवसार उग्ड्योर टाकीलॉ आन तॉस सालु सॉता पार उग्ड्योर पडलॉ. दरी पैसॉ नाय, उत्पान नाय. बारीक सारीक आजारपने मांगॅ लाग्लोते. अहॅ वाईट दी तॅआ वाटॅ आल्तॅ. पोर्यो आन जावाय हाड ने करतोते पन हारका हारका तॅँपा मांगॅसा सालुला आवडात नॉता. खरा मिंजॅ इ जक्ला इनुस आन विजूनॅ बगॅ पावता. तॅँआ अन्नाओर ओ वखत तॅँइ यॅऑन द्या पा नॉतॉ. अन्नानॅ तॅँशा करता कॉहॉ जीव आटविलॉ इ तॅँआ बायकां गाइ नायदॅ पन इनुस आन विजूला तॅ
मईत हॉता. सालुआ शिजूला तॅँआ दॉगाव पक्कॉ राग यासॉ. पन सालुआ पुडॅ तीआ कय सलात नॉता. मंग ती जक्लॉ राग सालुओर काडॅशी. सालुला फाडफाड आयक्यावॅशी. सालुला तीआ बॉलना पटातोता पन त्योरनॅ तॉ इनुस आन विजुला कय बोयलॉ तॅ आतॅपरात जा का कॅलॅ ता फुकाट गॅल्याहारका हॉयदॅ भगून तॉ मुक्काळॅ जक्ला सहन करतोतॉ.
कतू मामुसा आतॅ वय जाल्ता. पन यो जक्ल्यो वारता तॅआ कानोर जातोत्यो. तॅला इ अज्जिबात पटात नॉता. तॅनॅस सालुऑ न्याय करॅसॉ ठरविलॉ. कतूमामा एक आयत्वारॅ पॉराला घॅऑन सालुआ घारा गॅलॉ. तॅनॅ इनुस आन विजूला तडॅ बोलविला. सालुयो दोन बेनी मेरी आन नातालला सुदा तडॅ बोलविला. कतूमामाऑ निरोप येता खोटी जक्ले गरगरॅ धावात आले. आदी खबारबात तन जाली. शा पानी जालॉ. आन मंग कतू मामूनॅ विशयालास हात घायलॉ. तवपोत कुनाला कयूस कळाला नाय गा मामू कूनाबद्दल आन कॅबद्दल बॉलातॅ.
मंग सालुनॅ लान्या वयापासून कुटूमाकरतान का का कॅलॅ, कहयो खस्त्यो खाल्यात आन जकल्याय शीक्शाने, लग्ने कहे केले ता सब्बान सविस्तर हांगीला. आज ते जे सुखात आनंदात हात ता सालुमूळॅस. मामूनॅ सालुआ आख्ख्या आयुश्याव पाडॉ वाशीलॉ. सालुअॅ बाहा बेनी मान खाला घालॉन जक्ला आयकातोते. मेरी आन नातालश्या डॉळॅतनॅ आहु वाया लागलॅ. मामूला का हांगॅसा हाय ता तॅँना हुमजाला. तॅँआ काळजापोत पॉस्ला. मामूआ जक्ला हांगॉन जाल्योर बोठी बेन मेरी उबी रेली. तीनॅ सालुला वॅँग मारॉन ती खपखपॅ रड्या लागली. डॉळॅ पुहॉन ती बोयली, ‘माला बर्यापकी पेन्शन मिळातॅ, माये पोरे बरे कामायते जाल्यात. मॅ पुडश्या मयन्यापासून अन्नाला पास हजार रुपय देत जायनॅ. ऑ माऑ सब्द हाय.’ ऑडॅत नाताल बोयली ‘मॅ पन पास हजार देनॅ.’
आपल्यो बेनी ऑडा कर्या लागलॅत तॅ आपल्याला पन कय कॅला पाय आहा सालुआ बाहांना वाटॅ लागला. आदी विजू बोयलॉ, ‘मामू आमे आमश्या अन्नाला कतॅस टाक्याशे नात. तॅनॅ तॅआ आख्खा लाईफ आमाला दीलॅ, आमे कॉडा जरी कॅला तरी तॅइ भरपाई होऊ शके नाय. मॅ दर मयन्याला दा हजार अन्ना अकाऊंट मिंनॅ टाकीनॅ.’ इ आयकॉन इनुसनॅ सुदा दा हजार द्याशॅ कबूल कॅलॅ.’ इ जक्ला सल्लोता पन सालु एक सब्द बॉलात नॉतॉ. तॅआ डॉळॅतनॅ नुस्ते आहों गळातोते. तॅ पश्चातापाय हॉतॅ गा आनंदाय हॉतॅ ता कय कळात नॉता. कतू मामूला पन आहों आवरात नॉतॅ. कतू मामूनॅ त्याय डॉळॅ पुहिलॅ आन तॉ बोयलॉ, ‘तुमे जक्ले माये भासोंडे हा. याऑ माला खुब अबीमान वाटातॅ. तुमे आपल्या समाजापुडॅ एक नवॉ आदर्श उबॉ कॅलॅ. देव तुमसा आन तुमश्या पॉरांबाळां बरा कॅलॅबिगर रॅसॉ नाय.’ याला बॉलातॅत खरा “फॅमेली पेन्शन.”