मा मॉडक्या तॉडक्या कादोडीसॉ मॉडकॉ – डॉ. नेहा सावंत, दहिसर मुंबई.
कादोडी भाषेया आकर्षनापायी मॅ २०१४ मिनॅ मा संशोधना संकलनाश्या कामाला सुरुवात केली. रीतसर २०१७ मिनॅ मुंबई विद्यापीठामिनॅ PhD करता नोंदणी केली. जकला काम २०२२ मिनॅ खपला, आन मला डॉक्टरेट इ पदवी मिळाली. पन खरा हांग्यासा तॅ मा समाधान कय जाला नाय, कादो? गालिबनॅ जहा प्रेमाआ अथांगपणा आन गहनपना दाखड्यादो हांगिलॅ गा, “ये आग का दरिया है बस डूबते जाना है” तहीस माई अवस्था झाले. “ये कादोडी का दरिया है, बस डूबते जाना है, या गोते खाना है”. पांस स वहरे ऑडा अब्यास करॉन पान आहा वाटातॅ की माकून श्रीगणेशा कऱ्या पाय.
नमनाला घडाभर तॅल कादो? का जाला ता हांगातॅ. माआ एका पुस्तकादो मॅ कादोडी मिन्श्या ललित लेखांआ संकलन करतोती, त्यामिनॅ क्लेमेंट डिमेलोसॉ ‘केळ’ नावासॉ मस्त लेख वाशीलॉ. जाम भारी लिवितॅ क्लेमेंट. तॅ त्यातश्या ‘केळ’ या ललित लेखामिनॅ केळीआ बुडोर हींग्यो आलत्यॉ. अहॉ उल्लेख आलतॉ. माला फक्त हेगटायो हींगो माहीत होत्यो. त्या केळीश्या बुडोर हींग्यो कह्यॉ येद्यात अहॉ विसार माआ मनामिनॅ आलॉ. मंग डिमेलो सरनॅ मला हांगीला की, “केळीच्या बुंध्याशी जी केळीची बाळरूपं असतात, त्यांना हिंग्यो म्हणतात.” जहा मराठी मिनॅ घोड्याआ किंवा पाळीव प्राण्याआ वाहराला शिंगरू बोलात्याव तहास केळीआ बाळरुपाला शिंग्यो मिंजॅस हिंग्यो. शार वहारात ऑ शब्द माला माइत नॉतॉ, तॉ आतॅ माइत पडलॉ.
आतॅ या लेखा शीर्षकूस बगा गनी, आमी मराठी मिनॅ मोडकॉ बोयले तॅ त्याव अर्थ ‘तुटका, फुटका, मोडलेला’ अहॉ हॉतॅ. पान कादोडीमिनॅ ‘मोडकॉ’ मिनजॅ मराठीसॉ ‘घास’ मिनजॅस हिंदीसॉ ‘निवाला’ (‘निवाला’ मिनजॅ कादोडीमिनॅ थंडा जाला!) अही गंमत होयदॅ. कतॅ कतॅ मला समजॅ नाय ‘आह्यादो बाहालो’ मिंजॅ ‘हसायला विसरला’ की ‘अशाला बसला?’ कोडयॉ गमती जमती या भाशॅमिनॅ ! माऑ नेहमीस गोंधळ हॉतॅ ‘बघून, बगून, भगून’ यासॉ कुहनॉ शब्द कतॅ वापऱ्यासॉ? कतॅ कुनाला शुबेच्छा देताना हनायो बोल्यासा गा हनाशा, हनाव गा हना शुबेच्चा नक्की का वापऱ्यासा? मराठी मिनॅ प्रथम पुरुषी एकवचनी शब्द ‘ मी’ अहॉस वापरत्यात पन कादोडी मिनॅ काईक माहणे मॅ, म्यें, म्य, मे अहे शब्द योजतात, या मिन्सॉ नक्की कुहनॉ शब्द निवड्यासॉ?
माई जाम पंचाईत हॉतॅ जिगाळा निहण, निहाण, तळा, तळ्योर, बार, अहें कित्येक शब्द, ज्यांना एकापेक्षा अनेक अर्थच्छटा अहात्यात. पन एक नक्कीस कबूल कऱ्या पाय जॅ गा, कादोडी भाषेमिनॅ एकेका वस्तुश्या अवस्थेपरमानॅ त्याए नावे बदलात्यात, भगुन शब्दसंपत्ती घनी हॉत जातॅ. जहा की केळीआ पाना अवस्थेपरमानॅ पोंगी, खोलॉ, आंगाठ अहे नावे कोडे अर्थपूर्न हात तोडे इतर भाषामिनॅ कडे हायत ? आतॅ वारमोड कोडॉ अर्थसघन शब्द कादोडीत दिखातॅ, पन आहॉ शब्द किंवा या शब्दादो मराठीमिनॅ शब्दस हापडे नाय. आपुन मराठी मीनॅ वादळ बोलात्याव पान अर्थाशी जी मजा, जॉ अनुभव वारमोड मीनॅ व्यक्त हॉतॅ तॉ वादळ मिनॅ दिखे नाय.
आतॅ मॅ एक गंमत हांगतॅ. एक दि मॅ ‘बाळटीम’ बद्दल वाशीतोती. त्यामिनॅ मदरीन, पदरीनला ‘तात्याव पॉळो’ ऑहॉ उल्लेख आलतॉ, तॅ मॅ विसारात पडली, ओ तात्या मिनशामिनॅ कडनॅ आलो? त्याला पॉळो’ कादो द्यासॉ? अह्या जाम गमती जमतीतनॅ मॅ अद्याप हिकातॅ, तरी पन माला आहा वाटातॅ की, माला अद्याप कोडातरी हिक्यासा हाय.
सध्या कादोडी भाषेमिनश्या कथांवर एक पुस्तक प्रकाशित कऱ्याशी माइ खटपाट सालू हाय. यो कथा कुपारेतर माहनांना पन समजाल्यॉ पात भगून मॅ मराठीमिनॅ अनुवाद कऱ्यादो सुरुवात केली. माला वाटला, जाम सॉप्पा काम हाय. पण तडॅ बी पंचाईत, कारन मराठीमिनॅ जरा घनॅस आदरार्थी शब्द वापरत्यात. “ते फादर” आहा बोलतात, पण कादोडीमिनॅ प्रेमापायी “तॉ फादर” आहा बोल्याशी पद्धत हाय. या पर्मान मॅ अनुवाद केलॉ तॅ तॉ सुकीऑ वाटॅदॅ. बरा, कुनापा तपाशादो दिला तॅ त्यांना वाटायसा, नेहाबायला ऑडा पन जमॅ नाय ! ऑडॉ सुकीऑ अन् बॅक्कार अनुवाद करतॅ तॅ इआ मराठी पन् बॅक्कार हायदॅ. माला जाम धास्ती वाट्याशी. त्यामिनॅ पान इनास तुस्कानसॉ लेख , कथा अनुवाद मिंजे मा बोठ्ठी परीक्षा. कादो? एकदम पिव्वर कुपारीश्या म्हणी, कतॅ कतॅ मा भेजा आऊट होयासा. कारन माला त्याव जहॉ लाग्यासा त्यापेक्षा भलतॉस अर्थ निंग्यासॉ. मिन्जे एका भाषेतनॅ दुहऱ्या भाशॅमिनॅ अनुवाद करताना नुसतॉ शब्दांऑ अनुवाद करॉन भागॅ नाय तर त्या भाषेसा व्याकरण, परतेक शब्दाइ अर्थच्छटा, त्या भाषेइ संस्कृती या जकल्याऑ विसार कऱ्या लागॅदॅ.
कादोडी भाषेमिनॅ म्हणींऑ अक्षरशः खानी हात. दर आठ-दा दिहामिनॅ कोडयॉतरी जुन्यॉ जुन्यॉ म्हणी आमश्या सामवेदी शब्दसूची या व्हॉट्सॲप ग्रुप मिनॅ टाकित्यात (त्योर आतॅ स्वतंत्र काम जाला पाय आहा माला मनापासून वाटातॅ.)
गेल्या वहरा कादोडी अंकामिनॅ मॅ मा पिएशडीशी कानी लिविलती, तिगाळा वाटलोता गा मला आता ई कादोडी हुमजा लागली. पन आतॅ वाटातॅ की माऑ आख्खॉ जल्म खपॅदॅ तिगाळा मा हाता जुरुक्सा कयतरी लागॅदॅ. लिगरी लिगरी शब्दांय मा तळा भरदॅ. कारन ये कादोडी का दरिया है! बस डुबते जाना है बस् !
(विशेष आभार – सॅबी परेरा)