देवळाशी हप्पथ – सुजाता तुस्कानो, नंदाखाल
आज मॅ हाकोटेस विसार कॅलतॉ गा कयतरी करनॅ पन एकदोन वयस्कर खाट्यात पडलेल्या माहनांना भेट देनॅ… आन मंग विसार कॅलॉ, कुहना टाईम निवडॉ बरा ? कारन हाकोटे हाकोटे जासा मिनजॅ त्यांये आंघोळी-पांगोळीआ टाईम आहातॅ, दोपारा जासा तर जराक विहांबॉ घ्यासा टाईम, हांसा जासा तर मा टाईम जमॅ नाय. शेवटी मॅस ठरविला साडेदा-अकराआ टाईम बरबर हाय.
मॅ निंगाली… पयला खादो कय न्यासास नाय आहा मॅ ठरवॅानूस ठविलता, कारन मॅ कय नेनॅ खरी, पन डोकरे माहने, सगळास सगळ्यांना सले नाय. कुनाला हाकर तॅ कुनाला मिठा सलॅ नाय. तर कुनाला तॅलकाट बरा नाय, तॅ कुनाला तिखाट बरा नाय, मग आदी पयला बगॉ, मंग नंतर परत जावॉन त्याआ आवडीआ दिलेला कतॅही बरा.
मॅ पायरी सडली पान ओट्योर कुनूस नाय, मॅ दोन-तीन हाखो मारीत दरवाजॉ लोटीलॉ. दरवाजॉ उघडॉस हॉथॉ. घरात जानता माहनू कुनुस नॉता. दोन डोकरे माहने होते फक्त.
“कुन हाई रॅ बाबा..”
“दादय मॅ सुजा”
“आय… बाय पोरे… ये तू आलीआ, बाय तू कही हा”
“मॅ बरी हाय तुमॅ कहे हा.”
“आमॅ, मरो ना… का कऱ्यासा आतॅ कय सलात जायेगा… मरान कतॅ यॅ तिगाळा जायॅ, पण दॅवाला हांगातॅ पयला याला नॅ गा, आन मंग माला.”
दादय बॉलातोती पण मा आंगाला कापरी करतोती. “पोरे, एकदा वय जाला गा माहनू जीवाला कंटाळातॅ, सगळा नाका नाका वाटातॅ. कदो रॅसा, का खाये, मुक्काळॅ देवळा दारा जावॉन खाश्यात निजला गा बरा”
माला ई सगळा आयकताना खुप जड जातोता, पान का बॉलॉ, सगळा खरास तर हॉता.
“दादय, दादा आन वयनी कडे हाय?”
“बाय पोरे, त्या काम हाय ते मुंबय गेल्यात.”
“बाबा कहॉ हाय?”
“बाय, ओडे दि बेसकास्सॉ हॉतॉ पन दोनदी मिन्येस काकुळविलता.”
“बापरे कय?”
“आला बाय पूता, आतॅ हळुहळु त्रास वाड्यासॉस, आतॅ वय पान जाला गनॅ बाबासा.” मॅ बगीला, बाबा एका कड्या वळालॅ आन निजले. दादय हाथात लूजार घॅवॅान तेस करतॅ. मॅ दादयला विसारला, “दादय, बाबाआ खोलीत ओडी साफसपाई कुन करतॅ. दादय बोयली, “बाय, मॅ करतॅ. थोडा थोडा काम केला ते का होते ? माहनू झिजातॅ गा.” मॅ बगीला, खोली एकदम चकाचक साफ होथी, भॉठ्या भारी दवाखान्याला पान लाजविदॅ अही. केळे खराब जाले पा नात भगून खुटीला वर बांधील्यात. टॅावेल, टेबाल, भांडे सगळे चकाचक.
“दादय बाबाई आंघोळ कही करता ?”
“मॅ बाबाला तुकीतॅ. त्याला पक्षाघात जालॅ ना तॅ एक बाजू नबळी हाय तॅ ताहास तुकॉन नेतॅ, सगळे कपडे काडॉन टॉवेल गुंडाळलॉ गा बरा पडातॅ, मस्त वासाऑ हाबू लावीतॅ, मंग त्यावर पावडर सोळतॅ, गा साप-सूप हॉतॅ. त्यादिहा का जाला मायती हाया ? फादर आलतॉ कोमीनॉ द्यादो, तवूस मॅ बाबाला धवीलता आन पावडरूतन लावीलतॉ. बाबाला नवा गंजीफराक घायलोता. फादर बोयलो, आज बाबा सोबतात केवडे. मॅ हाकोटेस बाबासा दाडी-माथा कॅलता. तॅ बाबा सॉबातॉतॉ तॉहॉस, बाय.”
“मिनजॅ, तू दाडी करता ?”
“बाय, सात वहरे जाले मॅ दाडी माथा रॉज करतॅ. बघू, दाडी माथा कॅला गा कहॉ सापसुप दिखातॅ तॉ. लोक येत्यात तॅ पान हांगात्यात तुमशा खोलीत कुन शिक माहनू हाय आहा कुन हांग्यासा नाय. पान बाय त्यादिहा का जाला मयती हाय गा ? बाबा आख्खी रात निजलोस नाय फक्त लघवी जाग्यापा एका हाथायॅ खाजवितॉतॉ. मॅ बगीला, का जालॅ हायदॅ बरा ? बाय, आतॅ कुनाला हांगॉ ? पोरापारांना ई हांग्यासा तॅ ते डॅाक्टरला फोन करद्यात आन डॅाक्टरनॅ बी का करॅ ? अॅडमीट कऱ्या लावीदॅ.
मॅ हिम्मत केली, बाबाये सगळे कपडे काढले. बाय, तुला हांगॉ त्या लगवी जाग्यापा सगळे केहे वाडलोते, आन ते त्याला सावितोते. सगळॅ फोड फोड आलतॅ. तडे खाजवॉन तांबडा जालता. मॅ का केला मंग, त्याला बाथरूममीनॅ निला, खुरशीवर बेहविला आन नवीन बिलेट घॅवॉन सगळे केहे काडले, लान्या पोराघतीन तडे पुहीला आन घामोळ्याऑ पावडर लावीलॉ. बाय, आन तुला हांगॉ, बाबा जॉ निजलॉ तॉ दोन-तीन तास उठलॉस नाय. जिवाला सुख मिळाला. आते मॅ दर तीन मयन्याला सगळा साफ करतॅ.
एका वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाजवीदॅ आहा काम दादय करतॅ ? बापरे.. मॅ सगळा आयकातोती. तॉंडात शब्द फुटात नॉतॉ. एक परिचारिका मनूनपन आहा काम कऱ्यादो खुप कष्ट लागात्यात व हिम्मत पन. “पोरी, बाबा माला एक मिनिट बाजूला जावॉन दे नाय. नायतॅ भोठ्याभोठ्यान तॉ अराळ्यो मारतॅ. ‘इजमाल… इजमाल… आला कडेला गेली.’ आला पोरी, आजुबाजूशॅ लोक आयकात्यात तॅ माला बरा वाटे नाय पन का करॉ… पान बाय, ती पोरी ऑबाय कामोर गेले भाजी करॉन ठविले, तॅ मॅ जरासा धान वाळतॅ गा नाय.. पान तव याऑ जीव साललॉ.”
दादय पुढे बोयली, “बाबाला मॅ हांगीलॅ तू पयलॉ जाय.. कारन तू मांगॅ रॅलॉ तॅ तुये जीवाशॅ हाल हॉयद्यात आन गॅलॉ गा माला तडे लगेस बॉलावना धाड, मॅ बी अडे रॅवॉन का करॉ.. बाबा माला हांगातॅ, मॅ वरती गॅलॉ गा तूला जॉरायॅ जॉरायॅ हाको मारनॅ गा तू पटकान ये. वेळ लावॉ नाका. माला तू पाय तडे. तू शिवाय माई सॅवा कुन करनार नाय तडे…”
मायॅ डॉळॅ पान्यायॅ भरलॅ. संवाद आयकताना आंगाला कापरी आलती. मॅ बगीला पान दादय शांत आपली बाजू मला समजावितोती. ती ऑडा करॉन जराशीपन कुरकुर करीत नोती. कॉडा प्रेम हॉता त्या दोघांत.”
“बाय पोरे, तू मा पॉटश्या गॉळ्यापरमान हा बगून हांगातॅ, देवळात लगीन करॉन हप्पथ घेटलोती ना, मंगू आतॅ नाय बॉलॉन काहा सलदॅ.”
तब्बल ‘६० तॅ ६५ वहरे’ संसार करतोते ते दोगे, आन आज या पोरा-नातवंडा हाताखाला आपला सोताआ रडगाना न गाता एखाद्या आदर्श कुटुंबातसुध्दा नाय बग्या मिळ्यासा आहा ‘वार्धक्य निभाविणारा’ आदर्श वैवाहिक जीवनाबद्दल देवळात दॅवासमोर घेठलेल्या शपथीपरमान तंतोतंत वागणारा ‘आदर्श कुटुंब’, आज वयाशा ८०-८५ वहरातसुध्दा…
“पोरे, मॅ तुला मास सगळा रामायन हांगीला पान का दॅवॉ तुला पूता.”
“दादय, मला कय नाका, तुला अन बाबाला का आवडातॅ ता हांग मॅ हाडनॅ.” नाय नाय बॉलता तिनॅ खुंटीला टांगविलॅला फन्यासा एक कॅळा काढॉन मा हाथात टेकविला.
“पोरे ये परत लवकर” “बगीते, खुब खुब आबारी.” मॅ डोळे टिपीत निघाली. मा डॉळ्यासमोर चित्र उबा रॅला, नंदाखाल चर्चमीनॅ लगीन लागताना तॅ फादरनॅ वदविलॅलॅ शब्द… “जॅान, मी तुम्हाला माझा पती म्हणून स्वीकारते, सुखदुःखात, आजारात मी तुमच्याशी एकनिष्ठ राहण्याचे वचन देते.”
(श्रीमती सुजाता तुस्कानो राष्ट्रीय फ्लॅारेंन्स नाईटिंगेल पुरस्कार सन्मानित, निवृत्त परिचारिका, समुपदेशक. महाराष्ट्र-शासन.)