युटुपवर दिलॅ आन वाट्स अपवर आलॅ – ऑल्विन परेरा, नानभाट
घनी नाय पन एक पंदरा-वीस वहरा पुडशी गोश्ट, आज समाजात लॉकांदरी कार हात. तिगाळा तॉडॅ पन गावात मोबाइल नॉतॅ. इनकमिंग कॉलशे पैशॅ लागातोतॅ. लँडलाइन आन मंग टाटा रिलायन्स CDMA फोन या लागलॅ. तिगाळा बॅहता खोटी किशासॉ मोबाइल काडॉन चेक करॅशी पद्दतुस नोती. मोबाइल काडॉन बगॅसा का? बॅलेन्स बगॅसॉ, हरपाओ गेम खॅळॅसॉ आन गानॅ आयकॅशॅ. बेमट्यानानाऑ मोबाइलवाळॅँना बगॉन जाम संताप हॉअॅसॉ. दोनेक फुले भरॉन हांगॅसॉ ‘मायजई याई, अॅ फालतू शोक हाडलॅत कडशॅ? वडला बॉलना हाय. खुराप जीरवॅसॉ भयनॅ आन पैसॉ जीरवॅसॉ मुस्सुमानानॅ, कुपारॅअॅ कामे नात.’
काळ पालट्या टाइम लागॅ नाय, जिओ आलास गा आन बेमाट्यानॅ पण एक वनदेवी हिंगा डबीऑडॉ नोकीया हाडलॉ. पुडॅ पोरीआ लगीन जाला, दिडेक वहरान ती हनपाळन्याइ यॅऑन गेली. लूजी शीत दिहाला तीनदा उडॅसा, मंग बेमट्या लूजीनॅ बेमट्याइ पाठ काडॉन एक स्मार्टफोन आपवीलॉ. हाकोट-हांज विडिओ कॉल करॅशी आण नाताई खीत मॉडॅशी आहा सल्लोता.
आतॅ स्मार्टफोन हांगीला मंजॅ कोलूतुस नाय गा? बेमट्यानानाला अस्तॅ अस्तॅ तॅव ऊनगड लागात गॅलॉ आन तोक्ते वायदळापरी बेमट्या नावाशा तुफानानॅ खेव घायलॉ.
बेमट्यानॅ लूजीला ३२ वहरात कतॅ गुड मॉर्निंग कॅला नाय पण आतॅ हाकोटे ५.३० शा मिसा आदी २-४ ग्रुपवर बेमट्यादरनॅ कय गुलाबे, कय तळ्यात पॉवनारॅ बदक, फुलाय गुच्शॅ, कतॅ इंग्लिश तॅ कतॅ हिन्दी मराठी अहॅ गुड मॉर्निंगशॅ फुटू या लागलॅ आन येतॅ हात. अनुबव वाडात गॅलॉ आन बेमट्याला बांदयादो भयशे मुस्के हाडयाशे जाले.
शारसॉगात कय विशय काडॅ बास तव बेमट्यानॅ तॉँड हालविलास पाय. कय मईत नाय आहा नायुस. थॉड्यादिहान गावशे पोरे बी तॅला सानॅआ झाडोर सड्व्यादो बॉलॅशे, ‘नानो… तू उश्शार कॉडॉ रॅ?’ त्योर बेमट्या बॉलॅ ‘अरॅ, बाबा मेल्योर मंबय मा जीवोर पडली मनून नायतॅ शाळीआ रॅकाड मोडलॉसॉ तिगाळा मॅ.’
बेमट्याआ करियरशे जकले सोप्ने स्मार्टफोननॅ पुरे करॅआ घेटलॅत पन आतॅ.
युट्युबवर रिल्स आन वोट्सअपवर मेसेज विडिओ बगॉन तॉ कतॅ आयुर्वेदिक डॉक्टर हॉतॅ, कतॅ पुरातत्त्व शास्त्रज्ञ हॉतॅ आन कतॅ तॅआ होडक्या पॉलिटिक्सपासून पोपपर्यन्त फिरॉन येतॅ
एकदा ऑहॉस बेमट्यानॅ पॉट आतव्यासॉ उपाय बगीलॉ, पटलॉ आन हाकोटे उठताखोटी उदर्या तॉँडाय लिंबूपानी प्या सालु कॅला. एकदा आमॅ सेंटरवर कॅरम खॅळ्या बेहेलते. आमशा
टॉनीदादाऑ पॉर मंजॅ अॅका शरीरात दोन गव. आठवीत असताना पन ८० किल्यावर हॉतॉ हायदॅ. तॅला बेमट्यानानानॅ लिंबूपान्यावगैरे डोस पाज्या सालु कॅला. टॉनीआस पॉर ता..! पटकान बोयला, ‘नानो, तुला जकल्या दुनियाचं माइती आहेपन तुझ्या एवढ्या मोठ्या भुंडळ्या गेल्याय त्याचं ओखांद नाही सापड्लं का..? टेलरदरी ने, तुजे पाय शिवून देईल बग.’ हावॅसा कॉडा….! वॅळभर आमॅ ऑडॅ हावलॅ गा बेमट्या मांदरीगथ मुक्काय निंगालॉ.
ई आहा आपीपारी कय ना कय सालुस हॉता. पन बेमट्याला युट्यूबवर जेजूस मावली ओडीस शरदा होती. कडसा कय बगीला बास, गा याला जही गावभर कळव्या जाशी उतळी. वर बी हांगातॅ, ‘आरॅ युटुपवर दिलॅ गा. वाट्सतॅप वर आलॅ गा.’
कादरखान आन आसरानी यॅनॅ तीन तीनदा मारलॅ. हां, आतॅ कालपरवा धर्मेन्द्र दोनदा मारलॉ. तॅत तॅई कय सुकी नाय. तॅ ऑहॉ बेमट्या. पन बेमट्याइ लूजी बी कय कमी नाय. तॅ जाला आहा गा लूजीनॅ युट्यूबवर रेशिपी बगिली – पनीर भुरजी. आन बेमट्या नाक्योर डेरीत धाडलॉ पाव किलो पनीर हाडया. बेमट्याला पनीर सब्द कय आठवालॉ नाय.
तॅला लूजीनॅ रेशीपित कीसलॅला पनीर दावडलोता ता आठवाला. सादारन ताहास दिखातॅ मनून तॅनॅ पाव किलो मावॉ हाडलॉ. लूजी त्योरनॅ, ‘आई..! पनीर खवॉन हाडलाक्का. काम बरा कॅला हा.’ भुरजी करता करता मावॉ विताळलॉ. लूजी बॉलातॅ, ‘अय आयकात्या ? तुमाला पनीर फसवॉन दिला हां. सरबी गथ वितळातॅ बास ता.’ लूजीनॅ बी धाना आदी मीठा खाऑन फादरला डबॉ धाडॅसॉ वायदॉ कॅलतॉ. मंग का करता, तहेबाय ताते फोडले त्यातुस आन देवळा डबॉ रवानी कॅलॉ.
दुहरॅ दि फादर, लूजीन् बेमट्या तीगे नंबर काडॉन ईंदिशान घ्यादो. फादर हांगातॅ, ‘बेमट्याची बातमी आन लूजीची भुर्जी यांचा काही भरवसा नाही.’
तॅ मंडळी, एआय आन फेक बातम्याआ जमान्यात आपली गत बेमट्या-लूजी गथीन नाय जाली पा मनून सुबेच्छा..!