हाकर जाले हाकर – जोसेफ डाबरे

हाकर जाले हाकर – जोसेफ डाबरे (जेडी), निर्मळ

हाकोटशॅ नव-साडेनव जालॅ हायदॅत. बझार करॉन मॅ घारा अ‍ॅवॉन इंधाळॅत बॅहॅलतॉ. बझार बरॉ जालतॉ भगून स्वारी खुशीत ओथी. तव आगू फास फास मिंजॅ जवळ जवळ धावातूस आलॉ. आरॅ पेद्रु पटकान कपडे कर सल, आपलॅला आगाय जासा हाय. कादो रॅ? मॅ विसारला.

कपाळोर हात मारीत आगु बोयलॉ, ‘आरॅ बाहालॉ कहॉ, काल फादरनॅ मिसोर सूचना वाशीलती ना, आपल्या बँकेने फूल बॉडी चेकअप ठविले. आपुन फकस्त दा रुपय भरॅशॅ वरशॅ बँक दॅनार. नायतरी आपुन बॉलातॅवुस, बाकी बँकेत, सल पटकान. आपलॉ नंबर आगायश्या सेंट तेरेझा हॉस्पिटलला लागलॅ.

माइ कय जाशी इंच्छा नोती, पन आयकॅदॅ तॉ आगु कॅदो. मॅ घरात जाऑन नवा पांडा सदरा सड्विला आन इंबळोरश्या नाक्योर अर्नाळा बस पकड्या गेले. बस येता बरब्बर मॅ मिंगुला हांगातॅ, ‘पैला आत्मीश्यांना उतरुंदे पन अ‍ॅला सड्याशी घाई. माला तानला. तव निर्मळला उतारनार्‍या तॅआ कोळन्या टोपल्यास्सॉ मावरॅऑ पानी माआ सदरॅओर हॉळलॉ आन नव्या सदरॅइ वाट लाविली. आपल्या भाशेत हांगॅसा तॅ, “माआ सदरॅइ xx xxx” तुमाला हुमजालॅ हायदॅस.

कहे बहे आगाय पोसले. तडे पोसले तव का बगॅसा. शिलू, देगू, पावलू, नानू, शिमा, दुमा जकले लायनीत उबॅ हात. अस्ते अस्ते लाइन पुडॅ सरकात गेली आन माऑ नंबर लागलॉ एकदासॉ. नर्सनॅ रगात घॅआ करता हुई टोशीली. तीनॅ एकेक करॉन तीन शाव्ने भरले.

मॅ विसारला, ‘शीश्टर, कॉडा काडता बाय, वीकॅ गा का?” ती बिशारी आहात आहात बोयली, ‘नाही काका, वेगवेगळ्या टेस्टसाठी लागते तितकंच घेतलं. मंग तीनॅ आथाला स्पिरीट लाऑन पट्टी लाविली आन माला हांगातॅ, उद्या या रिपोर्ट न्यायला.

माआ पॉटात पडलॉ फाळ आन मनातश्या मनात मॅ होडली मिंगूला एक गाळ. या मायला उद्या माकून ऑड्या लाम यासा मिंजॅ, काय ती बस, काय ती गड्डी, काय त्यो कोळनी आन काय तॉ परवास. पन मिंगू हांगातॅ, याआस लागॅसा. तॅआबिगर आपलॅला कय हाय गा नाय ता कळॅसा काहा. मॅ हांगीला,’ माला का हाय ता माला माइत हाय. माला दोन पोर्‍यो आन दोन पॉर. तुला माइत नायदॅ तॅ तू ये. मिंगू बोयलॉ, आरॅ अक्करमाशा, आपलॅला का हाय मिंजॅ, कय आजार बिजार हाय गा का ता रिपोर्ट वरनॅ कळदॅ.               

मंग आमी निंगालॅ. आगाय नाक्योरनॅ अर्नाळा वसय पकडली अन नाळा स्टॉप हांगीलॉ. तडॅ उतरॉन पेट्रोल भरला अन हालात डॉलात घारा पॉसलॅ. दुहर्‍या दी माकून तीस बस अन तॉस मावरॅऑ पानी घॅऑन आमी हॉस्पिटलला पोसले. मिंगूनॅ तॅअ‍ॅ घॅटलॅ अन बार उतारलॉ.

मॅ आत्मीनॅ गॅलॉ तॅ डॉक्टर बोयलॉ, या काका बसा? मॅ बॅहॅलॉ. तॉ डॉक्टर माआ तोंडोर बगीतॅ आन रिपोर्ट बगीतॅ. मॅ विसार कॅलॉ जालॅ का? डॉक्टर काय झालाय? डॉक्टर नॅ तॉँड नहावीला. मॅ विसार करतॅ दोन दी जालॅ संताप माऑ सल्लॅ,

तीनशे रुपासा सदरा माआ खराब जाला आन अ‍ॅनॅ कादो तॉँड नाहविलॅ हायदॅ.

तव डॉक्टर बोयलॉ, काका, डायबेटीस. माआ धॅनात कय आला नाय ई तॅआ धॅनात आला भगून तॉ बोयलॉ, ‘काका तुम्हाला हाय शुगर आहे.’  मॅ जरा रागातूस बोयलॉ, ‘डॉक्टर का हांगॅसा हाय ता मराठीत हांगा’. तव डॉक्टर बोयलॉ, ‘काका तुमच्या रक्तात भरपूर साखर आहे. औषध घ्यायला लागतील.’ 

या मायला आडॅ शा मीनॅ टाकॅदो हाकर नाय आन रग्तात हाकर कडनॅ आली. ऑबडा ऑखांद लीऑन दिला. मायला इंधाळॅत बॅहॅलतॉ तॉ बरॉ हॉतॉ, खाली फुकाट या मिंगूआ नादी लागलॉ.