बी. टी. क्लब- अँथनी परेरा

बी. टी. क्लब  अँथनी परेरा, नंदाखाल

         दॉपारसा जिवान आटपॉन पेदर वडाआ झाडाखाला पारोर सुशॅगाद बॅहॅलतॉ. अजुन पारोर कुन आला नॉता. पेदरनॅ तमखा पिडीतनॅ शिमटीबर तंबक डाव्या तळहाथोर घॅतलॉ. उजव्या हाता आंगठ्या मॅरशा बॉटान्य थॉडॉ सुनॉ डबीतनॅ काडॉन तमखोर घॅथलॉ आन त्यास बॉटाय तमखोर तॉ घविलॉ. एक फूक मारॉन कसरा फुकॉन टाकीला. डाव्या हाताश्या तमखोर उजव्या हाथाई सापटी मारॉन पावडर झटकॉन टाकिली…आन् तमखाई गोळी ऑठाखाला ठवॉन दिली.

         दोनी पाय वर घॅवॉन तॉ आरामात बॅहलॉ, हवा मस्त येतोती. आजुबाजुला शांतता होती. मॅरशा निंबा झाडाखाला एक मांजर आंगाआ मुटकुळा करॉन निजलोती. माडोर बॅहलॅलो एक कागुळॉ तॉडॉ काव काव करॉन पेदरला सोबत करतोतॉ. लोकसत्ता पेपर उलटॉ-सुलटॉ करॉन पेदर साळतोतॉ, पिंक टाक्यादॉ तॉ थॉडॉ उठॅ तॅस त्या घरा मॅरसॉ मतेस बडबाड करीत येताना दिखलॉ. मतेसला बडबडात येताना बगॉन पेदरनॅ विसारला, ‘कारे मतेस ! आज ऑडा बडबडात, पाय आपटीत आलॉ तॉ? जिवान-बिवान जाला गा नाय?’

‘अरॅ, जिवान गॅला सुलीत, तॅआ मायला, बॉल्याशी पान कय सोय नाय!’

‘अरॅ, पान जाल्यॅ का ऑडा?’

आरे, पेदर, मॅ दिली एक गाळ मा बायकूला, आन जरा वरश्या आवाजात बोयला तर ती हांगातॅ, ‘ऑ, आवाज खाला. जास्ती आवाज कऱ्यासॉ नाय. भांडान नाय पा. गाव आपलॉ तंटा मुक्त रॅलॉ पाय’.

“मंग बरबर हाय!”

         ‘आरॅ का बरबर हाय? बायकुहरी पन भांड्यासा नाय? अरॅ भाजीई पशेंडी मिंगारा फॅकॉन दॅनार हॉतॉ. पन आमशी ई तंटामुक्त गावमंडळाई सभासद हाय. नुसतास लफडा नाका भगुन दिला समोरसा ताट फॅकॉन आन पडलॉ घराबार’

         अरॅ पेदर, घराघरात, गावागावात भांडान कदो पाय? गाव कहॉ एकदम हुता हारकॉ सरळ सलतॉ पाय. भुगूनूस सरकारनॅ तंटामुक्त गाव ई कल्पना हाडलॅ. जॅआ गावात भांडान-तंटॉ नाय तॅआ गावाला बक्षीसपान जाइर कॅलॅ. ई बग पेपरशी बातमी.

         अरॅ, जळॉन टाक तुऑ पेपर. तंटा मुक्त गाव पाय हांगातॅ. अरॅ पेदर, तुला हांगातॅ, तॉ आपलॉ आंब्याखालसॉ शिमा हाय ना, त्याई बय तॅआ बायकूला खूप बॉल्याशी. जाम तरास द्याशी. पन

         शिमाई बायकू पंचायतशा इलेक्शनमिनॅ निवड्यॉन आली. तिनॅ एक दि तिआ हाऊला दम दॅऑन हांगिला, ‘घरात आवाज नाय पा. गाव तंटामुक्त रॅला पाय. नाय तॅ कारवाई करनॅ. तिगाळा पासून तॅआ डोकरीऑ आवाज एकदम बंद जालॅ.

“आरॅ डोकरीला दाब्यासा आन आपुन गावभर मिटींग्यो घॅत फिऱ्यासा. वारे, वा. हांगातॅ तंटामुक्त गाव पाय”

अरॅ मतेस, आतॅ गाव हळू हळू सुदरातॅ. पयल्या हारकॅ गावात भांडान तंट्यॅ हॉत नाय. ई चांगली गोष्ट हाय ना?

         अरॅ का चांगली गोष्ट हाय, अरॅ तॉ आमश्या हेतोरसॉ क्रिष्णा परवा हॅत नांगरताना त्या ×××नॅ मा हॅताऑ कांडॉ वॅतभर फॉडलॉ. तॅला विसऱ्या गॅलॉ तॅ का हांगातॅ मतेस, तू कय भांडान कऱ्या आल्या? गाव कहॉ तंटा मुक्त पाय? मिजॅ यानॅ आमशॅ कांडॅ फॉड्याशॅ आन आपुन विसऱ्या गॅला गा तंटामुक्तीआ तुनतुना वाजव्यासा. वा रे वा तंटामुक्त गाव!” माई बायकू त्या तंटामुक्ती मंडळाई सभासद. तिला इ प्रकरन हांगिला तर का हांगातॅ, जाऊंदे ना. का वॅतभर जाग्याकरता भांड्यासा. मग ऑ आमश्योर अन्याय नाय गा? आन् हांगातॅ तंटामुक्त गाव. मॅ तर हांगातॅ ऑ तंटामुक्त गाव नाय, तर अळनी गाव हाय. अरॅ भाजीत काहा परमानात मीठा पाय, ताहा आपल्या गावात परमानात भांडान पन पाय. त्या शिवाय का मजा? नुसता गॉड गॉड बॉल्यासा, आन गॉड गॉड खासा ई कय जीवन हाया. आरॅ जिवनात कतॅ कतॅ मिरचीई फोडनी पान पाय” मग बग कही मजा येतॅ”

         आरॅ मंग तुआ मत का, रॉज गावात भांडान जाला पाय आ? अ‍ॅकमॅका डॉखा फुटला पाय आ? अरॅ, सरकारसा बरबर हाय, तंटामुक्त गाव जालॉ पाय”

         अरॅ, इ जकला मिळमिळीत. आपल्याला नाय इ पसांत. आरॅ, हाउ-ओसा, भाहा-भाहासा, नवरा-बायकुआ भांडान जाला पाय. आरॅ, भांडान जाला गा नंतर आपसात प्रेम वाडातॅ. आरॅ आपून अ‍ॅकमॅका अध्यात मध्यात जात्याव भगून तर भांडान हॉतॅ ना! नाय तॅ, ते शहराशॅ माहनॅ, ब्लॉक मिनॅ रॅत्यात. ना कुना अध्यात ना कुना मध्यात. ना कुनाहरी बॉल्यासा, ना हायासा.

         त्यांना हायादोपन टाईम नाय. निसती पळापळ. भगून तुला हांगातॅ ते माहने एकत्र जमाऌन जोरजॉराय आहात्यात. त्याला लाफ्टर क्लब बॉलात्यात. डॉक्टर हांगात्यात माहनाई दिहातनॅ दोन-तीन वॅळा जॉरजॉरात आहला पाय, ती माहनाई गरज हाय. – मॅ हांगातॅ भांडानपन जाला पाय. ती पन माहनाई गरज हाय. आन सरकार हांगातॅ तंटामुक्त गाव. मिनजॅ भांडान कऱ्यादो बंदी. च्या मारी आतॅ बॉल!”

         मतेस अरॅ तू हांगाता ता पन थॉडा बरबर हाय रॅ. मालापन एक आयडिया सुसलॅ. शहरात जहॅ लाफ्टर क्लब आहात्यात, तॉहॉ आपल्या गावात बी.टी. क्लब काढलॉ तर?

‘मिनजॅ इ का भानगड हाय?’

आरॅ बी.टी. क्लब मिनजॅ भांडान-तंटा क्लब. मयन्यातनॅ एकदा जकल्याई एकत्र जम्यासा आन अ‍ॅकमॅकाहरी ‘भांड्यासा’

हा ! आतॅ काहा बोयलॉ! झकास आयडिया हाय.

         पन मतेस, भांडान-तंटा मिनजॅ खॉटा खॉटा भांड्यासा पुना जकला बाहॉन जासा. तॅ शहराशे लोक कहे खॉटा खॉटा आहात्यात ताहा आपुन खॉटा खॉटा भांड्यासा, मिनजॅ तू हांगाता तॅआ परमानॅ आपला जीवन अळनी हॉनखर नाय. आपलॉ गावपन तंटामुक्त रॅदॅ आन गावाला बक्षीस पन मिळदॅ.

वा! पेदर तंटामुक्त गावमंडळा तुला अध्यक्ष कॅला पाय. मा मत तुला आत्तॅस दॅऑन ठोयतॅ.