बंड्याव जालाँ आप्पा – सिरील मिनेझीस, आगाय
आत्याशा टायमाला जोड्यॅ होशीये पोरे शाळीत जात्यात, तॉड्या होशीये आमशा टायमाला पोरे शाळीत गेलोशे तॅ तॅआ टायमाला आपल्या समाजात गाडाभर इंजीनीअर आन टोपलाभर डाक्टर जालॉशॅ. आन नाक्या नाकॅओर वडापावशे गाडॅ कहँ हआतॅत तहे, आपलॅ डाक्टर आन इंजीनिअरशॅ दुकाने हलोशे. आत्यॅ पॉरांना शाळीत जादो रिक्षा का? बस का? तिगाळा तंगड्यो तोडीत शाळीत जासा आन हातपाय गाळीत घारा यासा. आत्याशा पॉरांव युनिफॉम बगीलॅओर आमाला कुल्योर फाटलॅल्या टुमानीई तिगाळा नाय लाज वाटली, पन ती पँट आठवॉन आज लाज वाटातॅ. आज कालशा पॉराऑ युनिफॉम का हांग्यासॉ ? टाय का ? आन बुट का? आमाला पायात शिलपर सडवॅदो आठवी उजाडलोती, आन दाव्वी हॉयादो किती शिलपरशॅ जोड घालविलॅ तॅ आन बाबाअॅ किती धफाटॅ आन गाळ्यो खाल्यो त्याव हिशोबुस नाय.
पयलीत घायला तिगाळा आमसॉ बंड्या सात वहराव (तिगाळा या वयाला घोड्याई उपमा होती.) हॉतॉ. पयला वहरी पळन्यात गॅला. दुह-या वहरा तॅनॅ पयली गटांगळी पयल्यांदास पयलीतूस खाली. तिह-या वहरा आलूस मास्तरला ऑ दा वहराऑ घॉडॉ पयलीत कॉहॉ ठॉयासॉ? याई लाज वाटली, आन तॅनॅ आमशा बंड्याला “वरच्या वर्गात घेतले”. या उपकाराई भिड बंड्यानॅ शेवट पोत ठोयली. तॉ आलू मास्तरसॉ उजवॉ हात जालॉ. मास्तरला चारमिनार, एकशेवीस पान आन गायशाप हाढॉन दॅसा काम आपसुक बंड्योर आला.
फस्ट ईयर, शेकँड इयर करीत, पडात ऊठात आमसॉ बंड्या एकदासॉ सातवीत पॉसलॉ. परिक्षा आली गा तॉ घनॉ खुश हॉयासॉ, तॅला कारन शाळा लवकर हुट्याशी भगुन. इतिहास तॅव आवडतॉ विषय. एकदा तॅनॅ इतिहासावॉ पेपर लिवीताना सात पुरवन्यो घेटलॉत्यो. आन इतिहासात तॅला नॅमकॅ सातूस मार्क मिळ्याशॅ गा ? लोपीस मास्तर हांगात्यॅ,
“बंड्या, पस्तीस पूरवन्यो घॅटलोशे तॅ निदान पास तरी जालॉसॉ.”
आमशा या बंड्यायो गमती – जमती का हांग्याशो ? हिंदीऑ मास्तर पाटीलसरनॅ एकदा धडॉ हिकविल्योर, बंड्याला ऊबी करॉन हिकविलॅल्या धड्यासॉ प्रश्न विसारलॉ.
“लेखकने पैसे लेनेसे इन्कार क्यु किया?”
वाये, बंड्यानॅ कालूस भारत टॉकिजला ‘इंन्कार’ शिनिमा बगीलतॉ बास ! पाटीलसराव पश्नासॉ इंन्कार ऑ शब्द आयकॉन तॅला शिनिमातसॉ, ‘मुंगडा ‘डांस आठवालॉ, आन तॅनॅ बेधडाक उत्तर दिला,
“हेलन ने डान्स किया इसलिये लेखकने इन्कार किया.”
मंग का? पाटीलसरशा आंगात विनोद खन्ना संचारलॉ आन मंग तॅनॅ बंड्याला विलनला काहा मारातॅ तहा कुटीला. पन बंड्याला मार खाशी हव्वय जालती. तॅआ पायान आमशी हेडमास्तर गिरदरबाई बंड्याला काईमशी बॉल्याशी, “निर्लज्य सदा सुखी.”
मराठीत खुब म्हनी हायद्यात, पान बंड्या लक्षात ई एकूस म्हन रेली.
एकदा आठवित इतीहासा पॅपरात एक प्रश्न आलतॉ,
“दुस-या महायुद्दाची कारणे सांगा.”
आतॅ खॉटा कादो हांग्यासा ? या प्रश्नाआ उत्तर, अॅका पान पॉरानॅ आन पोरीनॅ लिवीला नाय, जकल्यांने या प्रश्नाला अल्लामत मोकळी जागा हॉडॉन रजा दिली. पान अॅकल्या बंड्यानॅ या उत्तर, उत्तर पत्रीकेत लिवीला. अर्थात ता वाशिल्योर मास्तरनॅ त्याई उत्तरपुजा घायली. इ तुमाला वायला हांग्यादो नाका.
आहा का लिविलता बंड्यानॅ? तॅनॅ लिविलता, दुस-या महायुध्दाची कारने पुढीलप्रमाने,
१.चिलखत २.जिरेटोप ३.बिचवा ४.वाघनखे.
इ वाशिलॅओर मास्तरला बंड्याआ जागॅओर अफझलखान दिख्या लागलॉ. आन मास्तरशा आंगात छत्रपती शिवाजी महाराज खिरलॉ. शाळा नेमकी हुटली भगुन बरा जाला, नाय तॅ मास्तरनॅ तॅव कॉथळॉस बायार काडलॉसॉ, कारन आमशा मास्तरसा आडनाव पान वाघमारे हॉता. (प्रत्यक्षात तॅआ मास्तरशा आख्या खानदानात कुनॅ उंदूर पान मारलॉ नॉतॉ .)
एकदा आमशा दुबे मास्तरनॅ “छाते की आत्मकथन” ऑहॉ विषय पॉरांना निबंद लिव्या दिलॉ. वर्गात एकशे एक हुशार पोरे, निबंद बोयलेओर जकल्याई हत्री फाटातॅ तही ## फाटली. अॅखाद्यानॅ निबंद लिव्यासॉ आन ऊरलॅल्या जकल्याय त्यायो झेरोक्स काड्याशी. ऑहॉ अलिखित नियम हॉतॉ. तॅआ पायान मास्तरला निबंदात कय वायला हापाडला नाय. पान बंड्याव निबंद
वासॉन, दुबे मास्तरला हिंदी भाषेई एक तिहरी लिपी हापडली. उर्दु आन हिंदी पलीकडॅ जाऑन बड्यानॅ नवी कुदिं भाषेऑ शोद लाविलतॉ. निबंदाई सुरुवात बगा……
“मॅ घरमॅ एकलॉ थॉ. सब लोग बाहर फिरनेको गये थे. मेरेको कंटाळॉ आयो थॉ. इसलिए मॅ खाटेओर पडॅआ थॉ. ऑड्यामे मला कोपरेसे आवाज आयॉ. मॅ देखा तो वो मेरी छत्री बोल रही थी !”
इ जकला मास्तरनॅ वासॉन दावडला तिगाळा जकले आह्या लागले. पान आज इ आठवाल्योर आपल्या भाषे बद्दल ऑडा प्रेम हणारॉ विद्यार्थी आमशा वरगात हॉतॉ, या माला अभिमानुस वाट्या लागलॉ
आतॅ या बँड्या, पुडॅ जाऑन काहा हॉयासा? ऑ प्रश्न तॅआ आयबाबा पेक्षा तॅआ मास्तरला आन हेडमास्तरला घनॉ पडलॉतॉ. पुडॅ ऑस बंड्या भॉठो बिल्डर जालॉ. तॅला जकले आप्पा हांग्या लागले. अब्यासात कस्सॉ हलॉ भगुन का जाला? व्यव्हारात तॉ अव्वाल हॉतॉ. आतॅ या आप्पाला बंड्या हा़ग्याशी कुनाई टाप हाय ?
आप्पाआ ऑफिसशा समोर दोन शा वाल्यो टप-यो हात. एक अण्णांनी टपरी आन बी नानांनी टपरी. आतॅ माहारकॅ मित्र आप्पा हॉफीसात गेलेओर आप्पा, अण्णा दुकानातनॅ शा मांगवीतॅ . पान आमशॅ मास्तर आप्पा हॉफिसला गेलेओर तॉ नाना दुकानातनॅ शा मागवितॅ, बिशारॅ मास्तर शाशी वाट बगॉन बगॉन शा न पॅता वळतॅ जातॅत. पान आमशा बंड्याला सॉरी आप्पाला तॅव ना खेद ना खंत.