‘दिनार’ सॉ आलॉ पूर… आन नावळीला जालॉ ऊहूर…!
– ईनास तूस्कानो, गास
‘शाब्या’ पडलॉ कूवेत रीटर्न. कूवेतवरनॅ येताना बक्काट ‘दिनार’ घॅऑन आल्तॉ. लगीन लावॉन परत तॅला बायकू हॅगाट कूवेतलास जासा हॉता. बय-बाबाई एक खांबाई माडी, मींजॅ अॅकलॉस पुत. गॅल्या रजेत आल्तॉ तीगाळा हॉन्या-नान्यापासून तॅ मांडव कॅटरींग सॉ जक्लॉ बंदोबस्त चोख करॉन गॅल्तॉ. बाज्या वाळ्याऑ तॅ तॅनॅ, होयरा जक्याशा पूडनॅस वहरीबर आदी बयानॉ दॅवॉन ठोईल्तॉ. बाकी रॅलॉ प्रश्न बारकी-सूरकी तयारी करॅसॉ, तॅ तॅआ महाभानॅ ती जवाबदारी घॅथ्लोती. कं नाय घॅदॅ. बरा ईर्शीला शर्टपीस-पँटपीस. भारीत्सॉ भारी खाजूर, बदामॅ आन भारी भारी शाकलेट, अत्तरायो बाठ्ल्यो, दर ट्रीप ला शाब्यो तॅदो न सूकता आढ्यासॉ. आन या टायमाला तॅ त्यादो शाब्यानॅ बॉठ्ठॉ कस्नॉ, सूनी (सोनी) गा का हांगात्यात तॅऑ टीवी आढ्लॉतॉ. आशार खाला गा लाशार हव्यास लागातॅ.
थॉडक्यात का ? तॅ शाब्याई लग्नाई तयारी फूल जाल्ती. तॅला धास्ती करॅसा कय काम नॉता. आलॉ गा, भंडारी हांगात्यात तहा ‘पाटावर नूस्ता बोहासां बसं’. शिटी पड्ल्यापासून तॅ तळने काड्यादो, हांज्या-लाग्ल्या पासून तॅ ऊंबराऑ पानी हाड्यापोत, मांडवा दीहा हाडी-सोळी घॅवॉन जानारॅपासून तॅ आयेज नॅनारॅपोत, लग्ना दीहा पासून तॅ सवदीहाश्या दीहा पोत. बरी सात-आठशे ‘दिनार’शी दारू यॅनॅ वाटीली. (१ दिनार = २३० तॅ २३५ ₹) आतॅ ‘दिनार’ ऑड्या करतान बॉल्यासा, कारन याला कतॅ पन वीसारला तॅ या ऊत्तर एकूस. ऑडॅ दिनार अडे खप्लॅ तॉडॅ दिनार तडे खप्लॅ. साळॉ दॅतॉतॉ ‘ईंडीयन’ रुपय पन ‘दिनार’सॉ माज दावड्यासॉ. आपल्यातॅ बी का करॅ ? बिना खूराबाए, पानॉ देतॅ ना ! मंग गपशूप दुव्याशी, आन ऊठताना बी वरती तीआ पाठीत थॉपॉ मारॉन ऊठ्यासा. भाख्डी जाली गा पाग हॉडॉन हॅपाटॉन द्याशी.
पैश्याऑ, सॉरीsss सॉरी ! ‘दिनार’सॉ हूकाळ ऑथॉ, तॅ लग्ना मीनॅ खर्स पन तॉहॉस कॅल्तॉ. बरॅ शार दीहाशॅ बाजॅ कॅल्तॅ. हॉकरॅनॅ ऊंबराऑ पानी पन बाज्याअॅस हाड्लॉ. बापाला पन त्या पैशाऑ माज. हांगातॅ, “सकाळ्या तळ्यातसॉ पानी ऊपॅदॅ, पन मा शाब्याअॅ ‘दिनार’ नाय खप्याशॅ.” बय हूक्की हूतेरी. पन आंगोरश्या त्या ‘दूबयश्या‘ हॉन्या डागीनॅमूळॅ तीआ वजान जेमतेम शाळीस-एक कीलो भरदॅ. लग्नादिहा फटांग्ड्याई माळ ओडी बोठ्ठी लाईल्ती, की दॅवळाऑ (मिसाऑ)
शेवटसॉ गानॉ खप्लॉ. बँड वाळ्या एक संगीत वाजवॉन जाला देवळोर, तरी फटांग्ड्याई माळ खप्यासा नाव नॉता.
पास-स संगित वाजवॉन जाले देवळोर. फूटु-शूटींग पन जाला. वीडीयो-ग्राफी पन जाली. (अयली पयली विडीयो शूटींग त्यानॅ गावात हाड्ली. पन त्या वीडीयो शूटींग आन त्याअॅ ‘दिनार’ या पायॅन लग्नात घोळ पडॅ, ता या ‘शेख’ला कडॅ मईत.) देवळोरनॅ नावळ निंग्यासा कय नाव नाय. कूनॅ तरी तॅला जावॉन कानात हांगीला. लवकर सल, जिवने ऊठव्याशे पन हात. तू अडॅस देवळोर उहूर जॅ करदा तॅ कंहा का हव्यासा ? शाब्याऑ प्रोब्लेम वॅगळॉस ऑथॉ. नावळी पूडॅ नासनारॅ गावात्शॅ तरून पॉर तॅला कय नंद्र्या पडात नॉतॅ. आन नीखळीस न नास्ता-उड्ता नावळ, ‘बामना’ नावळी घथीन न्याशी तर कही ? हॅबदाड-बॅबदाडाई नावळ थोडीस होथी ‘ती’? बॉलॉन सालॉन ‘दिनार’वाळ्या शाब्याई नावळ ती..
देवळा नींग्याशा पुड्नॅस यॅनॅ काळॉख्खायॅ पासू पा दाएक ‘दिनार’ दॅऑन ठोईल्तॅ. देऊळशॅ येताना नावळी पूडॅ पोरे नास्ले पात बघून. पासू आन कंपनीला नीव्या पोत धीर कडॅ ऑथॉ. बकरी मरॅशा पूडनॅस तॅई कॉथळॉ काड्लोतॉ. हॉकरॅई तॅला देवळापोत होड्ला, आन तड्नॅस बस पकडॉन हॉपार्या नींगालॅ बार मीनॅ. मांदरीया ऊंह्या खार्याऑ कूडकॉ… मंग मांदरीई नीज कदो लागातॅ.. शेब्याई हालत, ‘हॉला गॅला पान्याला आन पारवा बॅहला बगीत वाट. अहीस जाली.’
शेवटी ना सल्त्त्याला तॅनॅ बारके दाअॅक पॉराटॅ कंटाळलोते तॅ, आन शार पास बायको आन पोरयो रेल्त्यो त्यो हरी घेथ्ले, आन बँड मास्तरला ‘मार्च-पास्ट’शी खून केली. वराडी मंडळीपेक्षा बाज्यावाळॅस नावळी पूडॅ घनॅ दीखातॉतॅ. नावळ नींगाली बाबा देवळोरनॅ. देवळा गेटपा नावळ येतॅ बास तव ‘पासू’ अँड कंपनी रीक्षात्नॅ ऊतारली.
पासूऑ पयलॉस प्रश्न, ‘का रॅ, शाब्या. कॉडा वखत दॅवळोर काड्यासॉ रॅ ? लवकर नींगॉ सला. !’ तॉ बॉलतॉ हाय तव पास्कोल नावळी पूडॅ गॅलॉ. नवरा-नवरी पूडॅ ऊबी रॅलॉ आन तॅंना सलॉनूस दे नाय. आन वरसा घॅथ्ला… ‘आज पासूनsssss खप्ला रॅ शॅब्या तूझाsssss अठवर पssssन’.. साळॉ नावळ पूडॅ जावॉन देस नाय. शाब्या महाभा वैताकलॅला ऑथॉस.. तॅनॅ तॅस रागाअॅ पास्कोल सा गप्साट पकडला आन दीला नावळीया बार ढख्लॉन. साळॅ मूx प्या गॅल्तॅ त्या पायेन नावळ लेट केली. आन अजून बी लेट करॅ लावीलॅ !
पास्कोल सा गप्साट पकडता खोटी, सायमन शेब्याआ महाभाशा आंगोर गॅलॉ. तराड जाल्तॅ जकलॅ, तॅ बॉल्यासा कूनाला. मायकल सॉ पाय जाग्योर पडात पन नॉतॉ. तॅनॅ पन तडनॅ महाभाशा
टाय लास हाथ घायलॉ. टाय कय त्या आथात आली नाय, पन तॉस महाभाश्या आंगोर पड्या गॅलॉ. पन सायमन नॅ वँग्यात पकड्लॉ. तीगू सोगू महाभाश्या आंगाला झूंबलॅ. शेवटी शाब्यास मीनॅ पडलॉ. हॉडवा होडव जाली.
पन एक ‘तह’ जालॉ. लीडर पासू हांगातॅ शाब्या आमी तूऑ मान ठोईत्याव, पन यॉ तूऑ महाभा हाय, तॅला हांगॅ अडनॅ पासून तॅ हांशी नावळ ओट्योर सड्या पोत आमशा पॉरां मॅरॅ यासा नाय. आन आलॉ तॅ बीना टीकीट तॅआ घारा नवाळ्यात पार्सल धाडलास मनून समाज. (पाय अॅकाऑ पन जाग्योर पडात नॉतॉ मंग बी पार्सल कूनॅ बांद्यासा. पन, कूत्ता अपनी गली मे शेर।) थॉबा-थोबी जाली. तह पन जालॉ. नावळ वाट्याला लाग्ली परत.
नावळ सल्ती हाय तव मॅरनॅ एस्टी बस आली. पास्कोल परत कडनॅ आलॉ आन त्या बसवाळ्या पूडॅ ऊबी रॅलॉ.
एsssss बस होपsss होप. होप मींजॅ होप ! बसवाळ्यानॅ बस ऊबी केली. डायवर भिगावसॉ पीटर हॉथॉ. तॅला पॉरांई साल मईतूस ओथी. पॉराई बस कूट कूट कूटीली. आन शॅवटाला बस सालू जाली परत, तरी पास्कोलसा मन कय भरात नॉता. आंगात हाय ती थोडीस शांत बॅहॉन देतॅ ? पास्कोल नॅ सलत्या बस वर माकून कूट्या लावीला. बस सा पत्रा थॉडा फाटॉन बार आल्ता तॅहॅ त्या आथाला ऑरखाडॉ आलॉ. जूरूखसा रगात पन आला. पन बस थांबवॉन कूटीली त्या पराक्रमा पुडॅ ता रगात कीस झाड की पत्ती.
नावळ एकदाशी मांडवात पोस्ली बाबा. जक्ले पावने नावळी वाट बगीतोते. जीवनाई तयारी पासून तॅ दारूआ काऊंटर पोत सगळी तयारी ‘जय्यत’. फक्त केक काप्याशी खोटी. डॉमनिक मास्तर पयलॉस आथात माईक घॅवॉन स्टेजवर “हॅलो हॅलो माईक टेस्टींग १, २, ३ हॅलो हॅलो, करीत नावळीई वाट बगीतॉतॉ. नवरा-नवरी स्टेजवर सडले तवपोत साडेबारा वाजलॅ. आन डॉमनीक मास्तरनॅ राट झुपीलॉ. शेब्या वक्ता शेब्याई बय पास मईन्याई पूर्मुशी (प्रेग्नेन्ट) होथी त्यापासून, तॅ शेब्यो हल नींगूत स्टेज वर सड्लॉ तवपोत. जकला आळू बाँड घाठॉन जाला. तॅनॅ बरे वीस एक मींटे घाल्वीले तॅत. लॉकाना वाट्ला आतॅ केक कापॅ. पन मास्तरशा आथा माईक आलॅ तॅ मास्तर आयकातॅ ? आंदळ्या नंद्र्या सांद पड्लॅ. मास्तरनॅ शेब्या वाड्ग्या दो (बॉठ्ठॉ बाबा) लजार भेठ्वीली. मंग त्याई डोकरी…. मामरसॉ डॉकरॉ… मामरशी डोकरी… नवरीअॅ डॉकरा-डोक्री… तीया मामरशे… होथॅ नोतॅ तोडे जकले सरगातनॅ स्टेज वर आढ्ले.
अरॅ पन परसंग कूहनॉ हाय? टाईम कॉडा जालॅ? पावने खोटी हात ता, या डॉमनीक मास्तरला कळॅ पाय गनाय. वॅड्या आथात कोलूत… तॅ वॅडॉ नींगालॉ गाव पेट्वीत. शॅवटाला पासू अँड कंपनी कॉपर्यात ऊबी ओथी ते वैतागले आन तॅई जॉरजॉरात पापोळ्यो मारॅदो आन आड्ड्या सूरवात केली, तॅ झेट थांब्या तयारूस नात, शेवटी मास्तर समजालॉ आन आवारता घॅथ्ला.‘आता मी वधु-वरान्ना विनंती करतो की त्यान्नी केक कापून…..’ तीगाळा कडॅ कॉपर्यातनॅ टाळ्यो वाज्याशो बंद जाल्यो.
केक काप्लॉ. बार ओपन. जीवने सुरु जाले. वीडीयो शूटींग आन फूटू, स्टेजवर सडनारॅआ परतेक माहनाऑ शाब्यानॅ घॅठ्लॉ. तॅत त्या जाम टाईम खोटी जाला. तीन वाजलॅ तव पोत काऊंटर सालू ऑथा. जीवने ऊठता ऊठता साडे शार वाज्लॅ. तॅत बी शाब्याय वसयशॅ खास मीत्र (कुवेत-रीटन) बॅहॅल्तॅ. तॅ हांशॅ पास वाजलॅ तरी दारू प्याशॅ थांबलॅ नात. जिव्यासॉ तॅ पत्तॉस नाय. (VIP ट्रीटमेंट त्यांदो ओथी) शाब्या घडीबर त्यांहरी बॅहलॉ. दोन एक ढखल्लॅ. मंग तॅंना हांगातॅ माला सात वास्ता नावळ हाड्या जासा हाय. तूमी अँजॉय करा. मॅ आंग धऑन जरा फ्रेश हवातॅ.
सात वास्ता नवरॉ नींगालॉ नावळ हाड्या. जाताना तीन शार ‘बाठ्ल्यो’ तॅनॅ बेसमनला हांगॉन बंदोबस्त कॅलॉ. अडे हारोडी मांडवात पोस्ले, हारोडीशी मंडळी बगीतॅ तंव नवरॅआ खीरी वीडीयो शूटींगवाळ्यालास बग्यादो ऊल्टाल्ती. खर्या हीस्पाला आपल्या मीनॅ नावळ डॅवताना नवरी घरशॅ शक्यतो नासात नात. लेक डॅव्याशी तॅ सगळ्यान्ना दूख हवातॅ. पन अडे ‘पीक्चर’ कय वायलास ऑथा. वीडीयो शूटींग सल्ले, तॅ गावशी वेई मंडळीनॅस बगीतॅ तव मांडव अल्लामत आरंगील्तॉ. तॅत नवरीई मावशीपासून तॅ तीया भाआ पोत जक्लेस नाशा घूस्लोते. मांडवात वग कमी पड्लॉ तॅ बी ओट्योर पन खयताळॉ.
या गडबडीत नवरीई तयारी करॅसा कूनाला धॅन्सारूस रॅला नाय. थॉड्या वॅळान बगीतॅ तव पासू अँड कंपनी आली. ‘घूमराट’ दॉपारसा हॉतास आंगात. तॅत बी बेसमननॅ पासूला बोलवीला, आन ज्या पॉरापा ‘बाठ्ल्यो’ दील्त्यो तॅऑ पत्तॉ दीलॉ. पास मींनटात मंडळी रिचार्ज हव्वॉन मांडवात “अतीक्रमण”. मांडवात घूस्ता खूटी तूमाला हांगॉ धख्खा मूक्की आन नास्ता-नास्ता खालनॅ लाती सूरू जाल्यो. वॅई मंडळी मांडवातनॅ कडनॅ गूल जाली ता कळलास नाय.
पास्कोल नास्ता नास्ता, हाकोबटश्या बसशा स्टाईल मीनॅ बँड मास्तरशा पूडॅ आलॉ. मास्तरssss थांबाsss थांबाsss थांबाsss.! मास्तरनॅ कलानी हत्तीया हाँडी (सोंड) गथीन वरती केली. आन टँ अँ अँअँअँssss रीक… बाजे थांबलॅ. मास्तर.. माआ ई गाणा
घ्या…! (श्यान्या सतूराशा रे पूतरा या गीता सालीवर) गाडकूली ssssss! गाडकूली ssssss ! गाडकू ssssss ली ! नवरीशा बाबाशी आंडकूली ssss ! वाजवा !!!.वाजवा मास्तर !! आतॅ ई कय गीत जाला गा ? पन बॉलनार कुनाला. अॅकामॅका व्यायांशी टर खॅश्याशी रीतूस आपल्या लग्नात हाय ती.
बारके पॉराटे तरी कय कमी दीहाशे हाथ आ रॅ शाब्या गावशे ? हॉकरॅई मॅरशा फूलशेरी काकाआ गॉठ्यात दोन अॅटम-बॉम फोड्लॅ. तॅये ढोरे जकले भूर्खाले. तांब्या बैलानॅ तॅ नाथ तॉडॉन जॉ जॉट्टॅ हूटलॉ मॉकळॉ, तॉ ऊबी रॅदो हींवरात्शा राटोर. काकानॅ दोगी तीगी पोरे टूकॉन कानोर आहड्योते पन परत वीसार कॅलॉ लग्नात खयताळॉ नाका. पावने आठ वाजात आलॅ. शाब्या घडॅळोर बगीतॅ आन मास्तर वर बगीतॅ. नवरीई तयारी जाली बाबा एकदाशी. आतॅ खेमो घ्याशो आन नींग्यासा. पन यायो खेमो कय खपात नात. वीडीयो शूटींग हाय तॅ सगळ्योस बायको खेमो घ्या लागल्यात.
आठदीस पूडनॅ मरी काकय आन व्याईनीनॅ एकी-मेकींयो हेंड्यो ऊस्कील्त्यो, ती मरी काकय पन बगीतॅ तव खॅम घ्याशा लाईनीत ऊबी रेले. दापूडश्या बाल्या काकाआ डोकरीऑ एक पाय खाशा कड्योर हाय. ती बगीतॅ तंव नातीऑ आथ धरॉन डेवनीयोर नॅ सड्या लाग्ले खॅम घ्यादो. बायल्या फराशीं बगीतॅ, तव, तॉ पन खप-खपॅ रडॉन खॅम घ्या लाग्लॅ. पासूनॅ अंदाज घॅथ्लॉ. वीडीयो शूटींगवाळ्या कानात जावॉन कय तरी हांगीता खुटी कॅमॅरॉ मांडवात फीरलॉ आन फोकस बंद जालॉ. तह्यो खेमो बंद जाल्यो. पासूई नक्कल कामाला आली.
बाज्या वाळ्याई ‘बाबूल की दूवाए लेती जा’ गीत घॅथ्ला. आन मांडवातनॅ हेटॅ पाखड्ले. नावळ ऑफीशली नींगाली. पासूवा गाडा हारका-हारका जक्लॉता. तॉरनाऑ बांबू ऊस्क्या गॅलॉ तॅ तॅऑ तडॅ ‘कडेलोटूस’ जालॉ. जेमतेम तॅनॅ तॉ बांबू ऊस्कीलॉ. तॉरान काड्ला आन हतीरोर लाव्या लाग्लॉ तॅ, नवरीया वँग्यातूस पड्लॉ.
बॅज्या पॉरानॅ तॅ कमालूस केली. ती कडशी पाईप वेल्डींग करॉन बंदूकी हारकी बॉम पॅटव्यादो केल्ती. तॅतनॅ तॅनॅ बरॅ दाएक बॉम ईश्टाईल मारॉन पॅटवीलॅ. आतॅ पूडश्या बॉमला तॅनॅ वायलीस स्टाईल मारली. बॉम पेटवीलॉ आन एक तंगडा तूकॉन कडी खालनॅ हाथ घायलॉ. बॉम फूट्लॉ,,, ठ्ठो sss! बॉम सरळ, मन्या काकाआ पँड्या ऊडव्या मीनॅ. जकल्याई धावपळ. वॅई मंडळीत्शा कूनॅ तरी प्रसंगावधान दावड्ला, आन त्यो दोन तीन पेट्लेल्यो पावळ्यो ऊडव्यातनॅ
खसकन खेशील्यो, त्योर पाय मारॉन विज्वील्यो. अनर्थ टळलॉ. नाय तॅ ऊडव्याऑ तडेस राब पेट्यॉतॉ.
नावळ पूडॅ सलती हाय. हरान मयन्यात जही पान्याई हर-हाट मिनॅ-मिनॅ येती आहातॅ तहा ‘शाऊन’ आन ‘बाठ्ली’ नावळीत मीनॅ-मीनॅ फीरातॉती. नावळीया मॅरनॅ बगीतॅ तव शंभू पाववाळा सायकल आथामीनॅ घॅऑन ट्रिंग-ट्रींग ट्रिंग-ट्रींग करीत रस्तॉ काडीत साल्ला. बेम्ट्याआ पॉरा आंगात कळ कमी, तॅ हॉकरॅनॅ तॅई सायकलुस मांगनॅ धरली. भोजपूरी मींसा, भॉxx पन बॉलता येत नॉता. आन तरी झूंबलॉ तॅला. “एsss फलन वा ।” “कैसन हो । ईंहा आवा हो ।” “नाही धोई ककडी खाई का ।” “एsssss बूx च्योx रूका हो तनीक।”
भय्या बीशारा का बॉल्यासा. हांगातॅ. “ए बबूवा खाली फोकट गालीया काहे बकत हो हमका ? “हम कौनो तकलीफ दीये है का तोहके?” “हमका जाये दो। हमका देर हो गईल बा ।” बेमट्याऑ “लल्लक” ऑलॉ बुंबूल जालॅ तॉ आयकातॅ कदो. “ई लैलो। ईक ठो पैग वा मार लो हो।”- हांगॉन तॅपा शाऊन दीला. ता कय प्यादो तयार नॉता.. “बबूवा हमार धंदा का टाईम है । हमरे साथे ऐसन मजाकवा ना करो हो । तुहार बाबूजीके ऊमर के है हम।” ता नाय करतॅ, तव यॉ हांगातॅ – “हमरे शेब्या भाई का शादी है । तूमका पीयेके पडी।” भय्या कंहा बंहा हुटला. आन यॅनॅ बाज्यावाळॅ नाय गा थांबवीलॅ.
मास्तरला हांगातॅ. – मास्तर ! थांबा थांबा, मा एक हिंदी गाणा वाजवा. “खाना मीलेंगा ssss पीना मीलेंगा / शाब्याकी शादीमॅ दारू मीलेंगा।”वाजवा ई माआ गीत. कलमेत मीनॅ पड्लॉ, आन हांगातॅ, ‘ता कईस नाय मास्तर…..! “नाशीक ढोल” वाजवा. नाशीक मींजॅ नाशीक ढोलूस. वाजवा… वाजवा… ढाम… ढाम… ढाम…. टांन….!टांन….!टांन….! ढमा कडा…! ढमा कडा…! ढमा कडा…! नाशीक ढोल सालू जालॉ. “नाशीक ढोल सालू हॉता खूटी, एखूंद मस्ताड भय हडाला आथ लावीलॉ गा ऊडातॅ कही, तंहॅ जक्लॅ बीड्डा भूजीतानाशा वाला हारकॅ खापरीत ऊड्या लाग्लॅ. दाएक ऊड्यो मारल्यो, आन पासूवा पॉटात मळमळ्या लागला. कॉपरॅत गटारा मॅरॅ जावॉन दोनी आथ डॉख्याला तॅनॅ धरलॅ, आन बतकन खाला बॅहलॉ. पास्कोल जूरूख वॅळान तॅआ मॅरॅ गॅलॉ. तॅला हांगातॅ, ‘का रॅ पासू! ता डॉकरॅआ माहना गथीन खाला बॅहॉन का मूताता..! तॅनॅ पासूआ पूडॅ बगीला तॅ, बापरे..! अस्नी बोठ्ठी रांगोळी. तो तॅआ पाठीत दडप्या लाग्लॉ. अॅका पॉरा दरनॅ पानी आपवॉन पासूला ताँड धव्या लाईला. सव्वा नव वाजात आल्तॅ आन, ‘दिनार’ वाळ्या शाब्याई नावळ अजुन घारा पॉशॅशी हाय.