भारन्या – पॅट्रीक कोरीया

भारन्या  पॅट्रीक कोरीया, (नंदाखाल-अमेरिका)

बनाबाय. कही हा तू? बो टॅप जाला मिंजॅ आजीये मैनॉ जालॉ तू भेटली नाय. आंगबिंग नाय ना तापला? आला आत्याय ताप पटकान मस्तकी सडात्यात. तहॉ हायदॅ तॅ माला कळव्यासा गनाय. माला कळता तॅ जक्ला घर कादो गळतां? आला बी कय नाय ना पान ठावांव ठावठिकानॉ ठॉयादो मदत जालोशी. अडनेतडने धोवसोळ केली गा जरा पॅराडॉ कमी हॉतॅ. घरात एक माहनू शिक अहला गा जक्ल्योरतीस पॅंडॉ पडातॅ. माला जॅ मदतीला बोलविला तॅ मॅ कय परकॉ नाय ना. लानपनी आखिरी टायमात आंबॅ टुक्या जाशे तिगाळा मॅ बॉल्यासॅा – आबोरशा डोकरे आंबॉ पाड लो, एक घाव मॅ खायनॅ आन एक बनाला देनॅ. आठवाते  ना? 

भेट नाय भगुन बजारा गॅलतॅा तडने वळालॉ. तुयी खितू आली गा आन जरा कामू निंगाला. “मुगले मुगले नास लो” गीता मिने आपून लानपनी

“बना ओळ्या लिकाल्यो, लिकाल्यो।

बनाला आलॅ बाय आंबॅ, आंबॅ।

मम्बय नेता पिकलॅ, पिकलॅ।

आहां बॉलतोते ना? ततपासून माला लिक्यासा जाला गा तुआस ऑळ्या मॅ लिकातोतॉ. आज माला लिक्यादो वाटलॅ आन गरज पन वाटले. तू जवळशी वाटाता मनून आलॉ. गानॅतसा बन आन तू बना, यांत खूप फरक हाय पन तिगाळा कुनाला का माईत हॉता?

आज बजारा मा दरी एक टोपला भेंड्याआ हॉता. एक टोपला वांग्याआ हॉता आन एक दोदी हॉतॉ. कावडूस कऱ्योतीला, पन कडे मा खबाट -बिबाट खशेदॅं भगून, आन कावडीआ बजारभाडा जास्ती भगून, एकोरएक टोपला ठोईला, आन दोदी हाथात धरलॉ आन बजारा आल्तॉ. हाकोबोटशी काळोखात माला  मेली सुंबळू कडॅ दिखली नाय. तहॉ रोजकापडाव हुडकॉ घॅऑन तॉहॉस बजारा निंगाल्तॉ.

बजारा  ता उंडाला बाबुलाल भैयां माला का विसारतॅ हायदॅ ? माला हांगातॅ – “भावलनी, ये कद्दू (दोदी) कैसे दिया?” भावलनी…? माला बॉठा नवाल वाटला आन मनून 

मॅ अ‍ॅंगातॅंगा डॉकायलॉ. तॅ बगीतॅ आपलॅ ओळखिअ‍ॅ पासवाळॅ अ‍ॅका कॉपऱ्यात उबे हात, अन मा वर डॉकावॉन फिदी फिदी दातांए फळे काडॉन आहातॅत. माला जाम राग आलॉ. वाटला एकेकाई थॉबाडीत माऱ्याई. पन बिशारॅय दातबित पॅापकॅार्नश्या घतीन कडॅ बार पडद्यात आन नाय ती पंचायत हॉयदॅ .

आन काल वांगे खुडलोते तॅय काटॅ लागॉन माये बोटे हुजलोते भगून विसार बदललॉ. या पासवाळ्याई भैयाला हांगी अहल्या बिगर तॅआ भैयाला “भावलनी” मिंजॅ का ता कडनॅ कळला?

तॅआ पासवाळ्या कंपू मिनॅ पानमाळीसा ता कासुल्या मंगा पन हॉता. परशा वहरा एकदा तॅनॅ माला “वैनी” बोयलता तिगाळा मॅ तॅआ कारभारनी दरी, मिंजॅ पशीदरी  गराना कॅलता. पशी मा वर्गाशी ला. पशी माला बोयली जे मंगा दारू पॅऑन साप फुकाट गॅलॅ आन फुगलॅ. तॉ रॉज हाकुबोटसॉ उठातॅ आन आहारॅत डॉकायतॅ. फुगल्या गाला पायान तॅला तॅय गालामांगशे कान आहारॅत दिखात नाय. “पशे माय कान कडॅ दिखात नाय तॅ” आहा विसारतॉ आहातॅ. पशी माला हांगातॅ “गाडी घॅऑन दारापुडॅ भंगारवाळॅ फिरातॅत आन प्लास्टीक घॅऑन लहन देतॅत ना, तहॉ कुन तॅआ मंगाला घॅदॅ तॅ ती लहना बदल्यात मंगाला द्या तयार हाय.” इत पोत तिला तॅव विट आलॅ. तॅई गोष्ट होड. पन बी वारू हॉतॅ ना तॅ जकलॅ आपल्या गावश्या गोट्या पिरेल शा घरशे हॉतॅ. धुताऱ्यो धोन्ड्या, मिजेशी मन्या आन फुकटखाव फरशा! पिरेलश्या घरशे जव तव मा पितरालास पुरलॅलॅ आहातॅत. तॅंना फाटल्यात पाय कॉहॉ घालॅसॉ आन पडल्या डॉख्यात लात कही घाल्याशी ता नॅमका मायती. मॅ घारा जावॉन शेवतूला ई बोयलॉसॉ पण शेवतू बरी तॅ बरी, नातॅ हिंगोर घेदॅ आन खराखोटा कऱ्या निंगॅदॅ. आन माला फशी पाडदॅ भगून तूआ दरी आलॉ. जी विधवा हॉतॅ तिआ नवरॉ मॅलॅआ एक दुख आन माथा खड्ड्यासा ता दुहरा दुख, अहे दोन दुखे आहातॅत. तहा मा जालॅ.

आज माव बाप जिवंत असतॉ तॅ कॉडा बरा जालोसा? बाबाई खूप आठोन येतॅ ला. खूप मिंजॅ खूपूस भॉटॉ माव आधार गॅलॅा ला. भरल्या गाड्योरनॅ रनोर पागी टाकॉन मुत्या जातॅत तॉहॅा तॉ उठॉन अचानकूस मा मनाला रकरक लावॉन गॅलॅा ला.  माला तॉ काईमसॉ हांग्यासॅा, “पोरा , तुला भाआ नाय मिंजॅ आधार नाय, तॅ तू या गोट्या घरानॅआ उस्तीला कत्तेस लागॉ नाका. ई खॉटा घराना मॅ जवळनॅ बगिलॅ. या घरश्ये मतू आन कतू वायले

उतारले तॅ हालतॉ आडवॉ वाटीलॉ आन  मुहाळ आन सुलीत फुक मारॅशी फुकनळी उभी वाटीली. कादो तॅ कुनालास तॅव वापर करता आलॉ पा नाय. आहा खॉटापन आंगात होता भगून या खॉट्या घरान्याबरबर लागॉन आयुष्य फुकट नाका घालवॉ. मांदेळ्या करता होडक्या नाका बुडवॉ. तू उंदराव पोर हा भुगून तू लोखंडाय वॅव्हार करॅ जाव नाका. ई मायी तुला विनंती नाय तॅ आज्ञा समज. तुयो उड्यो आयबापा दरी आन जास्तीत जास्ती हावूहऱ्या दरी सल्द्यात पन बी कडॅ उड्यो माऱ्या जायदा तॅ मार खावॉन येदा. कुराडीये नाळ हडत्यात तहॉ तुला हडद्यात. शेवतूला भाआबेन नाय. मिंजे तुला हाळॉ बिडाव नात. एक तॉ अरदॉ आन दोगे ते सौगे.” कॉडा मॉलाआ हांगना ई?

पिरेल आन कुरेल यायी लडाई खूब वहरापासून पड्याशी. जराक्सा कय टासुकटूसुक जाला गा दांडॅबडगॅ निंग्याशॅ. मनून माला बॉल्या वाटे नाय ला. विनाकारन मा नावासॉ बॉंबाटॉ हॉयदॅ. एकदा ऑहॉस खूब मारॉ पडलॉतॉ आन कोड्यो बोंबो हाको जालत्यो! आमशा बदा बायनॅ तॅआ मारॅव बॅतान धसकॉ घॅटलॉ. मारॉ हॉऑन दोन वहरान तिआ लगीन जाला पन तॅआ धसक्या पायान ती लगीन जाल्या नंतर कय वहरान मेली. तिला तॅआ माऱ्यापायान भेदऱ्यो जालॉ ला. डॉक्टर हांगातॅ बाळतपनात मेली पन माला वाटातॅ ती तॅआ मारॅआ पायानूस मेली. तॅआ मारॅत पिरेलश्या झ्यावनॅ एक लांबा टॉकार आढॉन आमश्या हिंदाळ्योर जॉराय मारला. टॉकार जुना हॉता आन विवळी लागलोती भगून नातॅ नुकसान कॉडा जालॉसा मायती हाय गा? पोरे पारे जकले घाबरले गनाय! पन देव वरनॅ बगितॅ ला. आला दोन वहरान तॅला कुनाई नंदार लागली कुनाला मायीत. पन तॅआ झ्यांवला दोन संडास जालॅ आन तॅआ बळ घडक्यात विताळला. हॉतॅसॉ तॉ नवतॉ जालॉ आन खाशेत गॅलॉ. पिरेलशा त्या घारा कुन पॉर जन्मा आला गा आमसॉ डॉकरॉ दादा बॉल्यासॉ “पॉरांदो, हांबळा हा. पिरेलशा बाजूनॅ मारॉ करॅदो एक दांडूक वाडला.”

बना तुला मायती हाय मॅ गावा करता का कॅलॅ ता. गावात नव्यो ओआरो याशो. तॅतशा खूब जनींना हावळ्यो वळता याशो पन बिड्डीता याशो नाय. तिगाळा मॅ लागॉन हावळ्यो बिड्डील्यात. गावात लुगड्यावाळा यासा तॅला गावशो बायको “शेठ ये कैसा दिया, शेठ वो कैसा दिया” विसरॅशो. आला पन आपल्या बायकांई समज नाय हॉये जॅ ता लुगड्यावाळा पॉटापान्याकरता मॅला लोकां दारांमिगरनॅ फिरातॅ. तॅला शेठ बॉलॉन कय लुगडा सस्त्यात मिळनार हाय गा? तिगाळा मॅ ठराव कऱ्या बायकांना मदत करतोतॉ. किती वखत मॅ

झॅंडाबजारला जाऑन हायतनी लुगडे हाडॉन दिल्यात. कुनकुना बाईला आंबाडॉ बरॉ दिख्यासॉ. पन जिआ माथास कमी हाय तिला वेनी बरी दिखेदॅ. ई गोष्ट खरी गनाय? ता मॅ जॅ हांगिला तॅ मॅ कय वाइट कॅला गा हांगू? कोंबडी तात्योर मांड्यादो, मुड्ड्याशे आंबॅ घाल्यादो, फुग्याला पिठ घाल्यादो भरती ओहटी मायती अह्या लागातॅ. भरती कतॅ आन ओहटी कतॅ ता मॅ हांगिला तॅ तॅत बायकीपन कठ्ट्ये आला? भरल्या कोळनीआ टांग्यात एकलॉ टांग्यावाळॉ कोळन्या  मांडीला मांडी टॅकॉन बॅहातॅ तॅला कुन बायकुटा बॉलातॅ गा? ता जकलॅंना सलातॅ गनाय?  आला तिगाळा रडपती आलेल्या ओआरांना मॅ लोळ्यो कह्यो वळ्याशो आन ऑटॅा हारविताना पट्टे कहॅ काड्याशे ता हिकविले. आतॅ जकले शाने जाले. दारापुडॅ बांगड्या वाळा मिनार आलॅ आन एकेक करोन बांगडी सडवितॅ, तॅ त्यो बांगड्यो टिसात्यात ता माला दिखातॅ. तॅ मॅ तॅला दोनदोन तिनतिन सुडॅ एकत्र सडव आहा हांगिला तॅत मॅ का बॉठा पाप कॅला? माआ बॉलन्यान फायदॉस जालॉ ना? तॉटॉ तॅ नाय जालॉ?

पन बॉलतॅत ना जॅला वैती ठरविन्यात आलॅ तॉ वैती तॉ वैतीस रॅतॅ. मारणाऱ्याव हात धरता येतॅ पन बोलनाऱ्या तोंड कुन धरदॅ? ई जगूस तहा हाय. परमेश्वरांव एक शे एक पॉर जगात आल्तॉ तॅला या जगानॅ होडला नाय, तडे मायी का बिशात? माला संसार हाय तॉ करॅ लागातॅ भुगून, नातॅ मॅ यांना बरबर दाखडतोतॉ ला. संसारानॅस जकलॅंना अडविलॅ. येशू ख्रिस्तानॅ ऑडॅ चमत्कार कॅलॅ आन लॉकांना बरा कॅला आन ५००० लोकांना जिव्या घायला पन तॅला बायकू आन पोरे असते तॅ अहा कय तॅला करता आलोसा गा मला हांगू?

मॅ सॉताई समज घालतॅ जॅ घाबऱ्यासा कय काम नाय. या मिनसा कुन पान मा सादा पिकला अंगाठ पन मोडू शकॅसॉ नाय. भॉखॅद्यात भॉखॅद्यात आन रॅद्यात. शेवटी परमेश्वर हाय. तॅनॅस लाजारसला मॅल्यातनॅ उठविला लाजारस मिंजॅ लाजनारॉ आहास हायदॅ ला. तॉ पान तिनशार बेनॅव अ‍ॅकलॉस भाहा गनाय! मिंजॅ मा घतूस हायदॅ! मॅ जरासॉ लाजाळू हाय पन तॅला आतॅ का करॅसा. आला मॅ लाजाळू नाय ना. मला लाजाळू बनविलॅ. मॅ सात वहराव हॉतॉ तिगाळा बिडी पॅऑन रॅलेले थोडके टाकित्यात ना ते जमवॉन जकलॅआपुडॅ प्यासॉ. तॉ मॅ लाजाळू गा?

कतॅ कतॅ ई दुख सहन हॉअ‍ॅ नाय माला! दॅवा पुतानॅ , गुरूवारॅ हांज तॅ हुक्रूवारॅ दोपारशा तिन पोत सहन कॅला. पान माला आज किती वहरे जालॅ सहन करॅ लागातॅ? तॉ सुकीआ न्यायान हायदॅ, पन कय तरी रितीनुसार राजरोस पनॅ मारलॉ गॅलॉ. पन माला कुहनी रित गा न्याय न करतास कय बॉलनॅय मारातॅ? तॅला रोमन शिपायायी मारला. पन माला या

गाजल्या-फुगल्या दरने कय मारातॅ? धुताऱ्यो धोन्ड्याला बरा काम लागलोता, तॅ तडॅ लफडा कॅला तहॉ माथा खड्डॅान तॅला घारा धाडला. मन्या पायाला भुंडुळ्यो फुटल्यात त्या करता तॉ खळू टुकॉन सलातॅ भगून तॅला मिजेशी मन्या बॉलत्यात. फरशानॅ भायखाळा लागला तॅ हॉपाऱ्यापोत ऑड्या लॉकांना फशविलॅ गा आमसॉ मास्तर हांगातॅ – जर कुन ऑहॉ माहनू हाय दॅ कि जॅला मालाय टायमोरती आन पुरॅशॅ पुरॅ पैशे फरशादरनॅ मिळाल्यात हायदॅ, तॅ तॅआ माहानाव सत्कार जालॉ पाय’. आज पोत तरी ऑहॉ माहनु मिळालॉ नाय. लगीन कॅला ता पान “नाना दाखडलॉ आन फरशो वराडलॉ.” तर मॅ यांना गाजले-फुगले बॉलातॅ ता कय सुकीआ हाय गा? आन अह्या लॉकांदरनॅ माला ऑ शब्दाव मार खा लागातॅ? ऑ शब्दाव मार शारीरीक मारापेक्षा कॉडॉ भयानक आन जहरी हाय यायी कुनाला कल्पना हाय गा? दॅवादरी एकुस प्रार्थना हाय जॅ – “दॅवा, तुआ राज्यात तरी, जॉहॉ अपराध हायदॅ तहीस शिक्षा हायदॅ ना? मंग माव अपराध कुहूनॉ? कॉडॅ मॅ खून कॅल्यात आन मुडदॅ दडविल्यात? कॉडॅ मॅ बलात्कार कॅल्यात? कॉड्या लोकोंर मॅ बळजबरी केले आन कॉड्या लॉकांना मॅ दुखविलॅ?  गा मॅ जन्मा आलॉ तॉ माव अपराध हाय? तॉ अपराध हायदॅ तॅ तॉ माव नाय. तुला मा जीवन खपविता ये नायदॅ तॅ मॅ खपवॉ गा? माला यातनॅ होडव. माला न्याय दे. बास”

सल!  बनाबाय तू  माआ आयकॉन घॅटला आतॅ माव जीव हॅवसॉ दॉख जालॉ. आतॅ माला भारन्या, बायकोट्या, बायल्या, बाय, भावलनी, डॅरानी, वैनी आन जा जा हादेदे ता ता बॉला, माला कय फरक पड्यासॉ नाय. मॅ कडीआ हॉडॅान दिला. बाय माला निंगाला पाय. बजारातनॅ घारा न्यादो कुनॅ शिंगदानॅ घॅटलॅ तॅ कुनॅ तांबडॅ लाडू घॅटलॅ! पन मॅ? मॅ मेथिये लाडू घॅटलॅ. जरा कमरॅला बरॅ गा आन मान्याला बरॅ! तॅ लाडू तुला ठोईतॅ.

आला बी कय नाय पन पोरां हाता लाव्या मनून हाडलॅ. बॅहॅ तू. मला यॅ जकलॅ लॉखंडाय वॅव्हार हॉत नाय गा आन मा बळॅ आतॅ यो ऐनायो गाठी फॉडवात नाय. सल. आतॅ ऑ निंगालॉ तॉ नाळ्यात खाटका दरी वळनॅ गा आन पावशेर हागुती भाजी घॅवॅान सोपट घारा जायनॅ. आज पोरीऑ शाळीसॉ पयलॉ दी. तिला हमदाव्या लागॅदॅ. त्या पायी माला हप्पे रात निजूस नाय! घारा गेल्योर शेवतूनॅ पुना हजार सवाल कऱ्यात तॅ निराळॅ! नातॅ घारा उहूर जालॉ भगून “डाळडिऱ्यानॅ राब कॅलॉ  आन पानी अवारखंड्या गेलॅा” अही कय तरी ती हारवाहारव करदॅ आन मायी बोलती ती बंद करदॅ. अहॉ ऑ  सब्बान वॅव्हार हाय. माला कुहुन्यास बाजून हादवॉन देत नाय. दोन घडीव डाव तॅला जीवन ई नाव. आज पावमोड्यो कऱ्यात. बऱ्यो जॅ जाल्यो तॅ धिती येनॅ.